संख : तुबची बबलेश्वर योजनेची मुहूर्तमेढ २००९ ते २०१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पतंगराव कदम यांच्या पुढाकाराने रोवली. गेली चार-पाच वर्षे संघर्ष केला आहे. कर्नाटकाचे माजी जलसंपदा मंत्री एम. बी. पाटील यांच्या आशीर्वादाने पाणी मिळाले आहे. सामाजिक न्याय खात्याकडून जत तालुक्याला दोन कोटी मिळाले आहेत. विकास कामावरती खर्च करणार आहे. आम्ही सर्वांनी एकत्र येऊन तालुक्यातील १०० टक्के भूमी जलसिंचनखाली आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. असे आश्वासन सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिले.
संख (ता. जत) येथील शेतकरी व काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. प्रास्ताविक व स्वागत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिरादार यांनी केले.
विश्वजित कदम म्हणाले, जत तालुक्यात विकास कामाला अडथळ आणला जात आहे. शेतीच्या पाण्याची गंभीर समस्या आहे. तालुक्यातील वंचित गावांचा पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील आहे.
गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, तालुक्यातील पाणी प्रश्न सोडविण्याचा शिवधनुष्य उचलला आहे. पुढील काळात आम्ही सर्वजण एकत्र येऊन हा प्रश्न सोडविणार आहे.
काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आ.विक्रम सावंत म्हणाले, पालकमंत्र्यांनी म्हैसाळ योजनेतून सहा टीएमसी पाणी देण्याची घोषणा केली आहे. मात्र कृष्णा खोरे महामंडळाकडे तशी कोणतीच नोंद नाही. यामुळे हे पाणी मिळणार की नाही याबाबत नागरिकांच्या मनात शंका आहे. जर पालकमंत्र्यांनी घोषणाच केली असेल तर त्याची लवकर कार्यवाही करावी.
कर्नाटकाचे माजी जलसंपदामंत्री एम. बी. पाटील म्हणाले, माणुसकीच्या शेजारील धर्म म्हणून माझ्या हिमतीवर तुबच्या बबलेश्वर योजनेतून पाणी सोडले आहे. मी दरवर्षी सीमाभागातील गावांना दोन टी. एम. सी. पाणी सोडण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, काँग्रेसचेे शहर अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, बिळगीचे माजी आ. जे. टी. पाटील यांची भाषणे झाले.
कार्याध्यक्ष नाना शिंदे, जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील, पं स सदस्य दिग्विजय चव्हाण,सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चव्हाण, युवा नेते नाथा पाटील,नगरसेवक भूपेंद्र कांबळे, माजी नगरसेवक बामणे,माजी सभापती बाबासाहेब कोडग,संतोष पाटील, अनेक गावांचे सरपंच, सोसायटी सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
चाैकट
काँग्रेस पक्ष प्रवेश :
दरीबडची जिल्हा परिषदेचे सदस्य सरदार पाटील, नगरसेविका वनिता साळे यांचे पती अरुण साळे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप वाघमोडे, माणिक वाघमोडे, माजी पं. स. सदस्य नितीन शिंदे, आसंगीचे सरपंच श्रीमंत पाटील, पांडोझरीचे उपसरपंच नामदेव पुजारी यांनी काँग्रेेसमध्ये प्रवेश केला.