दत्ता पाटीलतासगाव : इंटरनेट अनलिमिटेड झाल्यापासून प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसतो. घरातील नातेवाईक देखील एकमेकांशी बोलण्याऐवजी मोबाईल मध्येच तोंड घालून बसल्याचे चित्र घरोघरी पाहायला मिळते. मात्र या सर्व गोष्टींना फाटा देत रोज दोन तास, मोबाईलसह सर्व करमणुकीची साधने बंद ठेवण्याचा निर्णय उपळावी (ता. तासगाव) येथील नागरिकांनी एकमताने घेतला आहे. या दोन तासात गावातील सर्व विद्यार्थी अभ्यासात मग्न असतात. तर नागरिक गावातील प्रमुख चौकात पारावर येत, गावच्या शेतीच्या विकासासह धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत चर्चा करताना दिसून येतात. त्यामुळे उपळावीकरांनी गावात बदलाचे तोरण बांधले असून, पारावरच्या गप्पातूनच गावच्या विकासाचे धोरण ठरवले जात आहे.मोबाईलवर रोज मिळणाऱ्या दीड जीबी डेटामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांपासून जेष्ठ नागरिकांपर्यंत सगळेच मोबाईल मध्ये गुंग असल्याचे चित्र घरोघरी पाहायला मिळते. रोजच्या दीड जीबी डेटामुळे गावातील नागरिक जवळ असूनही एकमेकांची विचारपूस ही करत नाहीत. मात्र यात बदल घडवण्याचा निर्धार उपळावी ग्रामपंचायतीच्या सरपंच अशाराणी कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला. नव्या वर्षाचा नवा संकल्प म्हणून एक जानेवारीपासून रोज सायंकाळी सात ते नऊ या वेळेत दोन तास मोबाईल, टीव्हीसह, सोशल मीडियाची साधने बंद करण्याचा निर्धार करण्यात आला. ग्रामपंचायतच्या या निर्णयाला गावकऱ्यांनी देखील एक मुखाने सहमती दर्शवली. एक तारखेपासून हा नवीन पायंडा सुरू झाला. .
मोबाईल बंद ठेवून केवळ विद्यार्थ्यांचा अभ्यासच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबरच नागरिकांनी देखील पारावर एकत्रित येऊन गावच्या विकासाच्या बाबतीत, शेतीतील पीक पद्धती आणि शेतीच्या धोरणांच्या बाबतीत सर्वांगीण चर्चा करून, विकासाचे धोरण ठरवण्याचा उपक्रम देखील सुरू झाला. त्यामुळे रोज सायंकाळी मोबाईल मध्ये गुंग असणारे गावकरी, आता पारावरच्या गप्पातून गावच्या विकासाचे धोरण निश्चित करताना दिसून येत आहेत. उपळावीकरांचा हा आगळा वेगळा उपक्रम कौतुक आणि कुतूहालाचा विषय ठरला आहे.
सोशल मीडियाच्या आहारी शाळेचे विद्यार्थी आणि तरुण पिढी जात आहे. याला फाटा देऊन शिस्त आणि सवयीसाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन रोज सायंकाळी दोन तास मोबाईल टीव्ही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याला सर्व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांच्या सकारात्मक बदल घडत असल्याचे दिसून येत आहे. - आशाराणी कदम, सरपंच, ग्रामपंचायत उपळावी(ता. तासगाव)
रोज सायंकाळी दोन तास मोबाईल बंद केल्यामुळे तरुणांपासून जेष्ठापर्यंत सगळे पारावर एकत्रित येत आहेत. शेतीची पीक पद्धती, तंत्रज्ञान यापासून गावच्या विकासाच्या बाबतीत देखील चर्चा करून निर्णय घेत आहेत. त्यामुळे गावचा एकोपा देखील वाढला आहे - सज्जन शिरतोडे, पोलीस पाटील, उपळावी.