अनिल पाटील, सरुड चांदोली (वारणा): धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये रविवारी दिवसभर पाऊसचा जोर प्रचंड वाढल्याने धरणाच्या चारही वक्रकार दरवाजे रविवारी ५ वा सुमारास उघडले असुन ना वक्रकार दरवाजातुन ५००० क्युसेक तर विधुत जनित्र गृहातुन १४०० क्युसेक असा एकुण ६४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदी पात्रात सोडण्यात आला आहे . या विसर्गामुळे धरण प्रशासनाने वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
चांदोली धरण १८ सप्टेबंर रोजी पूर्ण क्षमतेने भरले होते . शनिवार पासुन या धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु आहे . त्यामुळे रविवारी सकाळी धरणाच्या विद्युत जनित्रामधुन १०६७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु होता . दरम्यान रविवारी सकाळपासुन पावसाचा जोर वाढल्याने धरणाच्या वक्रकार दरवाजातुन प्रथमता २९०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता . मुसळधार पावसामुळे दुपारनंतर धरणात ६४०० क्युसेक एवढ्या पाण्याची आवक होऊ लागल्याने सांय ५ वा . नंतर पाण्याच्या विसर्गात वाढ करुन धरणाच्या वक्र दरवाजातुन ५००० क्युसेक तर विद्युत जनित्र गृहातुन १४०० क्युसेक असा एकूण ६४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात आला आहे . या विसर्गामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली आहे . पावसाचा जोर वाढल्यास धरणातुनही पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असल्याने धरण प्रशासनाने वारणा नदीकाठच्या गावांनासतर्कतेचा इशारा दिला आहे .