सांगली जिल्ह्यात चारही प्रमुख पक्ष अस्वस्थ; काँग्रेस मात्र स्वस्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 06:42 PM2023-07-05T18:42:00+5:302023-07-05T18:42:38+5:30

जिल्ह्यातील समीकरणे बदलण्याची चिन्हे

All four major parties upset in Sangli district; But Congress is healthy | सांगली जिल्ह्यात चारही प्रमुख पक्ष अस्वस्थ; काँग्रेस मात्र स्वस्थ

सांगली जिल्ह्यात चारही प्रमुख पक्ष अस्वस्थ; काँग्रेस मात्र स्वस्थ

googlenewsNext

सांगली : राज्याच्या राजकीय घडामोडींचे थेट परिणाम जिल्ह्यातील राजकारणावर झाले आहेत. पक्षांतर्गत बदलत्या वातावरणाने भाजप, शिवसेनेचे दोन्ही गट व राष्ट्रवादी या पक्षातील नेते, कार्यकर्ते सध्या अस्वस्थ दिसत आहेत. दुसरीकडे नेत्यांची एकजूट व राज्यातील राजकीय गोंधळापासून दूर राहिल्याने काँग्रेस स्वस्थ आहे. पुढील सहा महिन्यांत आणखी वेगवान राजकीय घडामोडी होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील समीकरणे बदलू शकतात.

वर्षभरापूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली. शिंदे गट व ठाकरे गट अशी विभागणी झाली. राज्याप्रमाणे जिल्ह्यातही दोन्ही गटांत पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे विभाजन झाले. त्यामुळे चारऐवजी पाच पक्ष जिल्ह्याच्या पटलावर दिसू लागले. राज्यातील सत्ताधारी शिंदे गट व भाजपच्या सरकारला वर्षपूर्ती झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच राष्ट्रवादीत फूट पडली. अद्याप नवा गट जिल्ह्याच्या राजकीय पटावर दिसत नसला तरी तो दिसण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. सांगली, मिरजेतील अनेक पदाधिकारी नव्या गटाच्या संपर्कात आहेत. त्यामुळे हा गटही लवकरच अस्तित्वात येऊ शकतो. त्यामुळे पुढील निवडणुकांमध्ये सहा पक्षांचे अस्तित्व दिसेल.

पक्षांतर्गत वातावरणाचा विचार केल्यास सध्या जिल्ह्यातील काँग्रेस वगळता सर्व पक्ष अस्वस्थ आहेत. राष्ट्रवादीच्या आगमनामुळे मंत्रिपदाच्या शर्यतीतून जिल्ह्यातील इच्छुक भाजप नेत्यांचा पत्ता कापला गेल्याने त्यांच्यात कमालीची अस्वस्थता आहे. ज्या राष्ट्रवादीविरोधात आंदोलने केली, आरोप केले त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ राज्यात आली आहे. त्याबद्दल जिल्ह्यातील निष्ठावंत गटात नाराजी आहे. अशा राजकारणाला त्यांचा पाठिंबा नाही. त्यामुळे आधीच गटबाजीने त्रस्त असलेल्या भाजपला पक्षांतर्गत नाराजीचा सामना करावा लागेल.

राष्ट्रवादीच्या वाट्याला अनेक मंत्रिपदे गेल्याने शिंदे गटाला असुरक्षित वाटत आहे. जिल्ह्यात आमदार अनिल बाबर यांना मंत्रिपद मिळण्याच्या शक्यतेवर राष्ट्रवादीच्या सत्तेतील सहभागाने पाणी पडले. सत्तेतील वाटेकरी वाढल्याने शिंदे गटही अस्वस्थ आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेसह भविष्यातील सर्व निवडणुकांसाठी आता दोनऐवजी तीन पक्षांत जागावाटप होणार असल्याने शिंदे गटाची दावेदारी कमकुवत होऊ शकते.

राजकीय अस्थिरतेचा फायदा काँग्रेसला?

केवळ गटबाजीची चिंता घेऊन वाटचाल करणाऱ्या काँग्रेसमधील नेत्यांनी गटबाजीचा प्रश्नही संपविला आहे. जिल्ह्यात पक्षाचे सारे नेते एकवटले आहेत. राज्याच्या राजकारणात काँग्रेसला अशा पद्धतीच्या फुटीचा सामना करावा लागला नाही. त्यामुळे राज्यासह जिल्ह्यातील अस्थिरतेचा फायदा काँग्रेस घेण्याच्या तयारीत आहेत.

Web Title: All four major parties upset in Sangli district; But Congress is healthy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.