सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने अंगारकी संकष्टीला (दि. २) सांगली शहरासह जिल्ह्यातील सर्व गणेश मंदिरे भाविकांसाठी बंद ठेवण्याचे आदेश शनिवारी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले. मंदिरांत केवळ धार्मिक विधी होतील. भाविकांना दर्शनासाठी प्रवेश मिळणार नाही.
राज्यातील काही भागांत कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी जिल्ह्यात अद्याप परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, या आठवड्यात पहिल्यांदाच ३० वर रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जत्रा, यात्रांसह गर्दी होणाऱ्या उत्सवांच्या आयोजनावर निर्बंध घातले आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू आहे. दि. २ मार्चला अंगारकी संकष्टी असल्याने सांगलीसह हरिपूरच्या बागेतील मंदिर आणि जिल्ह्यातील इतर गणेश मंदिरांत भाविकांची गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्व गणेश मंदिरे केवळ धार्मिक विधीसाठी खुली राहतील. मात्र, ती भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्यानेच हा निर्णय घेण्यात आल्याने नागरिकांनीही मंदिरात गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.