इस्लामपूर : इस्लामपूर आणि शिराळा मतदारसंघावरील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विडा उचलला आहे. परंतु त्यांनी सर्वच पक्षातील इच्छुकांना उमेदवारीचे आश्वासन देऊन भाजपमध्ये येणाऱ्यांवर पदांची खैरात सुरू केली आहे. परिणामी काँग्रेस, भाजप, शिवसेना, महाडिक गट, हुतात्मा गट व रयत क्रांतीचे नेते अस्वस्थ झाले आहेत.
इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीपासून बांधलेली विकास आघाडीची मोळी आता सुटली आहे. चार दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीला या आघाडीतील नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना तसेच शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांना डावलले होते. विकास आघाडीत बिघाडी झाल्याचे स्पष्ट असले, तरी दोन्ही गट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांचेच नेतृत्व मानत आहेत. मात्र भाजपने सर्वांनाच झुलवत ठेवले आहे.
इस्लामपूर मतदार संघात निशिकांत पाटील यांना भाजपची उमेदवारी मिळणार, अशी हवा त्यांच्या समर्थकांनी केली आहे. आता कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मुलगा सागर याला भाजपमध्ये घेऊन त्याची भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी वर्णी लावली आहे. त्यामुळे येथून भाजपची उमेदवारी सदाभाऊंना मिळणार असल्याची चर्चा रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांत आहे. युतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेकडेच आहे, असे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार सांगतात. त्यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी उमेदवारीचा शब्द दिला आहे.शिराळा मतदारसंघातही गोंधळ कायमशिराळा मतदार संघात भाजपची उमेदवारी मिळाली की विजय आपलाच, असे समजून आमदार शिवाजीराव नाईक, महाडिक गटाचे सम्राट महाडिक आणि काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांनी मोर्चेबांधणी केली आहे. हे सर्वच गट भाजपच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. या सर्वांना चंद्रकांत पाटील यांनी आश्वासन दिल्याचे बोलले जाते.