सांगली : महापालिका क्षेत्रातील नाल्यांमधील पाणी घरांमध्ये शिरते, त्यामुळे वित्त आयोगातून टप्प्याटप्याने सर्वच नाल्यांचे बांधकाम करण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला. यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे आदेश महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी प्रशासनाला दिला. गुंठेवारी नियमितीकरणालाही सभेत मुदतवाढ देण्यात आली. कुपवाड ड्रेनेज योजनेच्या २५० कोटीच्या प्रस्तावालाही मान्यता देण्यात आली.
महापालिकेची ऑनलाइन महासभा सोमवारी महापौर सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पार पडली. सभेत चैत्रबन सोसायटी ते आरवडे पार्क या एकाच नाल्यावर दहा कोटी रुपये खर्च करण्यास भाजप सदस्यांनी विरोध केला, तर काँग्रेसचे संतोष पाटील, विजय घाडगे यांनी याच नाल्यावर खर्च करावेत, अशी मागणी केली. यावर सभागृहाचे एकमत न झाल्याने सर्वपक्षीय गटनेते, आयुक्त व अन्य अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे महापौरांनी जाहीर केले. संजय मेंढे, योगेंद्र थोरात यांनी मिरजेतील नाल्यांचा मुद्दा उपस्थित केला. तेथील नाल्यांचे बांधकामही झाले पाहिजे, अशी मागणी केली.
कुपवाड ड्रेनेज योजनेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यास मंजुरी देण्यात आली. या योजनेच्या मलशुद्धीकरण केंद्राच्या जागेवरून भाजपच्या सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला, तर सत्ताधाऱ्यांनी शंकाकुशंका काढून पुन्हा योजनेला विलंब नको, अशी भूमिका घेतली.
गुंठेवारी नियमितीकरणाला सभेत मुदतवाढ देण्यात आली. शहरातील अनेक खुले भूखंड सर्रास विकले जात आहेत. या भूखंड माफियांसह त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी करण्याची मागणी सभेत झाली. वीज बिल घोटाळ्यावरही सभेत चर्चा झाली. संतोष पाटील यांनी ग्राहक न्यायालयात महावितरणकडून बिलाच्या वसुलीसाठी दावा दाखल करण्याची मागणी केली. त्याला शेखर इनामदार यांनीही समर्थन दिले. सध्या बिलांचे शासकीय ऑडिट सुरू असून, त्यातून घोटाळ्याची रक्कम निश्चित झाल्यानंतर ग्राहक न्यायालयात दावा करण्याचे आदेश महापौरांनी दिले.
चौकट
स्वप्नातही आयुक्त येतात...
भाजपचे धीरज सूर्यवंशी यांनी आयुक्त नितीन कापडणीस यांच्यावर मनमानीचा आरोप केला. चैत्रबन नाल्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवायचा; मात्र स्थायी समितीसमोर वेगळी भूमिका घ्यायची आणि महासभेत तिसरा विषय आणायचा, असा आयुक्तांचा कारभार आहे. त्यांच्यामुळे नगरसेवकांत भांडणे होत आहेत, अशी टीका केली. त्याला आयुक्तांनी जोरदार प्रत्युत्तर देत ‘काही जणांच्या स्वप्नात सध्या आयुक्तच दिसत आहेत’, असा टोला लगावला.
चौकट
भोसले-सूर्यवंशी वाद
सभेत नगरसेवक अभिजित भोसले व धीरज सूर्यवंशी यांच्या खडाजंगी झाली. भोसले यांनी आयुक्तांच्या कामाचे कौतुक केले. त्याला सूर्यवंशी यांनी आक्षेप घेत भोसले यांच्यावर टीका केली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या भोसले यांनी सभागृहात येत आपणास बोलण्यास देण्याची विनंती महापौरांकडे केली. यावेळी सभागृहात उपस्थित सूर्यवंशी व त्यांच्यात जोरदार वादावादीही झाली.