राज्यातील ग्रामीण भागात रूग्णसेवा करणाऱ्या परिचारिकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्याबाबत शासनाचे दुर्लक्ष आहे. बंधपत्रित परिचारिकांची समस्या सोडवावी, सेवाज्येष्ठता व पदोन्नती मिळावी, रिक्त पदे भरावीत या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील परिचारिका ५ सप्टेंबरपासून संपावर जाणार असल्याचे महाराष्ट गव्हर्न्मेंट नर्सिंग फेडरेशनच्या खजिनदार सुमन टिळेकर यांनी सांगितले. परिचारिका दिनानिमित्त त्यांच्याशी केलेली बातचित...प्रश्न : रुग्णसेवा करणाऱ्या परिचारिकांची काय अवस्था आहे?उत्तर : राज्यात आरोग्य विभाग व वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालयात काम करणाऱ्या सुमारे २५ हजार नर्सेस आहेत. शासकीय रूग्णालयात असलेल्या अपुºया सुविधा, डॉक्टरांची रिक्त पदे, डॉक्टरांची अनुपस्थिती, औषधांचा, सुयांचा तुटवडा या समस्यांना परिचारिका तोंड देत आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या तुलनेत आरोग्य विभागाच्या रूग्णालयात अवस्था अधिकच वाईट आहे. गरीब रूग्ण उपचारासाठी आल्यानंतर तेथे डॉक्टर व औषधे नसल्याने, रुग्ण परिचारिकांवर राग काढतात. रूग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांना मारहाणीच्या प्रसंगांना परिचारिकांना तोंड द्यावे लागते.
प्रश्न : परिचारिकांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन कसा आहे?उत्तर : यापूर्वी परिचारिका म्हणून काम करणाऱ्या महिलांना सन्मान मिळत नसे. मात्र अलीकडच्या काळात ही परिस्थिती बदलली आहे. शासकीय सेवेतील परिचारिकांना चांगले वेतन मिळत असल्याने त्यांचे भवितव्य सुरक्षित आहे. समाजाचा बदलला तरी शासनाचा दृष्टिकोन बदललेला नाही. आरोग्य विभागात मोठ्या संख्येने रिक्तपदे असल्याने परिचारिकांवर त्याचा ताण पडतो. ग्रामीण रूग्णालयात डॉक्टरांच्या अनुपस्थितीचे प्रमाण मोठे असल्याने तेथे रूग्णांवर उपचार करणे, त्यांना सांभाळणे ही परिचारिकेसाठी तारेवरची कसरत आहे. रिक्त पदे भरावीत, पदोन्नती मिळावी या मागण्या प्रलंबित असल्याने, राज्यातील परिचारिकांनी ५ सप्टेंबरपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.
प्रश्न : काम करताना मिळणाऱ्या सोयी-सुविधांबाबत परिचारिका समाधानी आहेत का?उत्तर : रिक्त पदे असल्याने अधिकाऱ्यांकडून अधिक काम करण्यासाठी दबाव टाकण्यात येतो. पगार बिले, फरक बिले, भत्ते देण्याबाबत विलंब करण्यात येतो. प्रभारी पदे रद्द करण्यात आल्याने त्यांचेही काम परिचारिकांनाच करावे लागते. चतुर्थश्रेणी कर्मचाºयांची संख्या अपुरी असल्याचे रूग्णांना स्ट्रेचर, ट्रॉलीवरून नेण्याचेही काम करावे लागते. पाचवा व सहावा वेतन आयोग देताना काटछाट करण्यात आली. केंद्राच्या तुलनेत राज्य शासनाच्या सेवेत असलेल्यांना वेतन कमी आहे. दहा टक्केपेक्षा जास्त पुरूष परिचारक असू नयेत, असे नर्सिंग कौन्सिलचे निर्देश आहेत. मात्र पुरूष परिचारकांची संख्या वाढत आहे. संसर्गजन्य रोगांशी संबंध येणाºया परिचारिकांना विमा संरक्षणाची आवश्यकता आहे.
प्रश्न : खासगी रुग्णालयात प्रशिक्षित परिचारिकांना सेवेची संधी का मिळत नाही?उत्तर : खासगी रूग्णालयात कमी वेतनावर अप्रशिक्षित व बोगस परिचारिकांची भरती करण्यात येते. खासगी रूग्णालयाची नोंदणी होतानाच तेथे काम करणाºया परिचारिका प्रशिक्षित व पात्रताधारक आहेत का, याची तपासणी झाली पाहिजे. मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याने खासगी रूग्णालयात प्रशिक्षित परिचारिकांची संख्या अत्यंत कमी आहे. प्रशिक्षित परिचारिका नसलेल्या खासगी रूग्णालयांवर कारवाई झाली पाहिजे.- सदानंद औंधे, मिरज