तासगाव : कोरोनाच्या काळात राजकारण नको, तर माणसे वाचवूया, असे सांगत तासगाव तालुक्यातील भाजप व राष्ट्रवादी वगळता १२ पक्ष व संघटनांनी ‘आम्ही तासगावकर कृती समिती’ची स्थापना केली आहे. गुरुवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली.
सोबत फिरणारी जिवंत माणसे सोडून जात आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. बेड आहे तर ऑक्सिजन नाही, व्हेंटिलेटर नाही, लसी नाहीत यांसह असंख्य समस्यांचा सामना सर्वसामान्यांना करावा लागत आहे. त्यामुळे ‘आम्ही तासगावकर कृती समिती’च्या माध्यमातून लोकांची काय सेवा करता येईल, यासाठी तालुक्यातील बारा पक्ष व संघटना मिळून ही राजकारणविरहित समिती तयार केली आहे.
यात भाजप व राष्ट्रवादी वगळता काँग्रेस, शिवसेना, आरपीआय, शेतकरी कामगार पक्ष, वंचित बहुजन आघाडी, प्रहार, संभाजी ब्रिगेड, स्वाभिमानी शेतकरी संघटना, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, श्रमिक मुक्ती दल, परिवर्तन चळवळ, बौद्ध समाज संघ, सरपंच परिषद, मेंढपाळ आर्मी यांचा समावेश आहे. यावेळी कस्तुरबा हॉस्पिटल लवकरात लवकर चालू करावे, जिल्हा परिषद गटनिहाय दहा बेडचे हॉस्पिटल उभारावे, तासगावच्या ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालय दर्जा द्यावा, कोविड लसीकरण तासगाव शहरात करावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी संबंधित पक्षांचे तालुकाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.