संतोष भिसे, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : भाजप सरकारची वाटचाल देशात पुन्हा मनुवाद आणण्याकडे सुरु आहे. देशभरातील हिंदुत्ववादी व भाजपचे नेते धार्मिक विद्वेष भडकवणारी वक्तव्ये सातत्याने करताना दिसतात. संभाजी भिडे यांचे महात्मा गांधीविषयीचे वक्तव्य त्याचाच एक भाग असल्याची टीका विविध वक्त्यांनी केली. भिडे यांनी गांधींविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ सोमवारी सांगलीत सर्वपक्षीय निषेध आंदोलन झाले, त्यावेळी आंदोलकांनी भाजप व भिडे यांच्यावर जोरदार टीका केली.
स्टेशन चौकात झालेल्या आंदोलनात कॉंग्रेससह पुरोगामी व विद्रोही चळवळीतील कार्यकर्ते सहभागी झाले. महात्मा गांधींच्या विविध वचनांचे फलक आंदोलनस्थळी प्रदर्शित केले होते. त्यांचा अखंड जयघोष आंदोलकांनी केला. ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. बाबुराव गुरव, वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, कॉंग्रेस महिला आघाडीच्या शैलजा पाटील, राष्ट्र सेवा दलाचे सदाशिव मगदुम, `रिपाइं`चे सुरेश दुधगावकर, कामगार संघटनेचे सुरेश दुधगावकर, ज्योती अदाटे, आशिष कोरी, किरण कांबळे, पद्माकर जगदाळे, हमाल पंचायतीचे विकास मगदुम यांच्यासह नगरसेवक मनोज सरगर, अमर निंबाळकर, मालन मोहिते, अजित भांबुरे आदी सहभागी झाले.
प्रा. गुरव यांनी मनुवादी प्रवृत्तीचा निषेध केला. पृथ्वीराज पाटील म्हणाले, देशाच्या सर्वधर्मसमभावाच्या भूमिकेला छेद देणारे वर्तन सत्ताधाऱ्यांकडून सुरु आहे. विशाल पाटील म्हणाले, कोणीतरी विद्वेषी टीका केली म्हणून गांधीजींचे महत्व कमी होणार नाही.
हिंदुत्ववाद्यांच्या विरोधामुळे बंदोबस्त
भिडे यांच्याविरोधात होणारी आंदोलने उधळून लावण्याचा इशारा शिवप्रतिष्ठान आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर आंदोलनस्थळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. दुपारपर्यंत आंदोलन सुरु राहिले, पण इशारा देणारे हिंदुत्ववादी फिरकले नाहीत.