सांगली : जिल्ह्यातील सर्व पक्षीय साखर सम्राटांनी शेतकऱ्यांच्या विरोधात गट्टी केली आहे. गेली तीन आठवडे ऊसदराचे आंदोलन सुरू असून एक ही कारखानदार कोंडी फोडायला तयार नाही. साखर सम्राटांनी शेतकऱ्यांच्या सहन शक्तीचा अंत बघू नये, असा इशारा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला.खराडे म्हणाले, यंदाच्या उसाला प्रति टन पहिली उचल तीन हजार ५०० रुपये आणि गत वर्षी गळितास गेलेल्या उसाचा दुसरा हप्ता ४०० रुपये द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू आहे.यासाठी साखर आयुक्तांना निवेदन दिले, मोर्चा काढला. त्यानंतर साखर कारखानदारांना निवेदन दिली आहेत. त्याच्या कारखान्यासमोर ढोल वाजविला, ऐन दिवाळीत त्यांना खर्डा भाकरी दिली. रस्ता रोको आंदोलन केले. ऊस वाहतूक करणाऱ्या गाड्या अडविल्या, ऊस तोडी बंद पाडल्या. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. मात्र, त्या बैठकीत ऊसदराबद्दल कोणताच तोडगा काढला नाही. कारखानदार काही बोलायलाच तयार नाहीत. कारखानदारांची हाताची घडी तोंडावर बोट आहे. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांविरोधात कारखानदार एकत्र आले आहेत.शेतकऱ्यांना वाढीव काही द्यायचेच नाही, यासाठी कारखानदारांची गट्टी झालेली आहे. त्यामुळे ऊसदरांची कोंडी फुटायला तयार नाहीत. कारखाने शेतकऱ्यांच्या मालकीचे असूनही भिकाऱ्यासारखे दरासाठी कारखानदारांकडे विनंती करत आहे, तरीही कारखानदार दर जाहीर करत नाहीत. कारखानदारांनी शेतकऱ्यांचा अंत न पाहता ऊसदराची कोंडी फोडावी, अन्यथा आंदोलन गंभीर वळणावर जाईल. त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा खराडे यांनी दिला.
कारखानदारांची बैठक कधी होणार?साखर कारखानदारांच्या व्यवस्थापकांची बैठक दिवाळीत झाली. यावेळी कारखानदाराचे व्यवस्थापक निर्णय घेऊ शकत नाहीत, त्यामुळे अध्यक्षांची बैठक चार दिवसांत घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आश्वासन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले होते. व्यवस्थापकांबरोबरची बैठक होऊन आठ दिवस झाले तरीही कारखाना अध्यक्षांची बैठक बोलविली नाही, ती तातडीने घेण्याची मागणीही महेश खराडे यांनी केली आहे.