लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निवडणुकीत तांत्रिक कारणांमुळे काही अर्ज राहिले. भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी संयुक्त आघाडीच्याच तेरा जागा असल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी शुक्रवारी सांगितले. आघाडीच्या तेरा उमेदवारांची नावेही जाहीर करण्यात आली. नेते आणि सदस्यांमध्ये कोणतीही गटबाजी नसून साठही सदस्य आमच्यासोबत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नियोजन समिती निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीची लांबणीवर पडलेली बैठक शुक्रवारी पार पडली. निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी झाली आहे. या आघाडीतील तेरा उमेदवारांची नावेही जाहीर केली. सर्वसाधारण गटातून सतीश पवार, सुहास बाबर, तम्मणगौडा रवी, शरद लाड, सुरेंद्र वाळवेकर, विक्रम सावंत असे सहा, तर महिला गटातून स्नेहलता जाधव, सुरेखा जाधव, आशा पाटील, आशाराणी पाटील, जयश्री पाटील, रेखा बागेळी, रेश्मा साळुंखे या सात महिला उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली.
शिंदे म्हणाले की, निवडणुकीसाठी आघाडी करण्यात आली आहे. तिन्ही पक्षांनी जे उमेदवार दिले आहेत, ते अधिकृत आहेत. आम्ही जाहीर केलेले तेरा उमेदवार आघाडीचेच आहेत. त्यामुळे तेराही उमेदवार निवडून येणार असल्याचे स्पष्ट आहे. कोणत्याही पक्षातील नेते आणि सदस्यांत नाराजी नाही. जिल्हा परिषदेतील साठही सदस्य आघाडीचे आहेत. अर्ज माघारीची चर्चा सुरू होती, या कारणामुळे काही अर्ज राहिले आहेत. मात्र ज्यांचे अर्ज राहिले आहेत, ते आमच्याबरोबरच आहेत. त्यामुळे गोंधळ होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.
नियोजन समितीसाठी दि. ४ सप्टेंबरला निवडणूक होणार आहे. सर्वसाधारण गटातील १३ जागांसाठी मतदान होईल. तिन्ही पक्षांना आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी एकमेकांची मदत घ्यावी लागणार आहे. भाजपला महिला गटासाठी सहा मतांची गरज आहे.राष्ट्रवादीला सर्वसाधारण गटासाठी तीन, तर काँग्रेसला एका मताची आवश्यकता आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन आघाडी स्थापन केली आहे. पक्षांकडे असलेले मतदान बाहेर जाणार नाही, त्याबाबतची खात्री नेत्यांना आहे. मात्र कुणी कोणाला कसे मतदान करायचे, याबाबतची माहिती सदस्यांना मतदानाला जाण्यापूर्वी सांगितली जाणार असल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शिंदे यांनी सांगितले.आघाडीचे उमेदवार...आघाडीतील तेरा उमेदवारांमध्ये सर्वसाधारण गटातून सतीश पवार, सुहास बाबर, तम्मणगौडा रवी, शरद लाड, सुरेंद्र वाळवेकर, विक्रम सावंत असे सहा, तर महिला गटातून स्नेहलता जाधव, सुरेखा जाधव, आशा पाटील, आशाराणी पाटील, जयश्री पाटील, रेखा बागेळी, रेश्मा साळुंखे या सात महिला उमेदवारांची नावे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष शिंदे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष आ. कदम आणि जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी शुक्रवारी जाहीर केली.सत्यजित देशमुखांचा राजीनामा नाही : कदमजिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सत्यजित देशमुख यांनी गटनेते पदाचा राजीनामा दिला नसल्याचे जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम यांनी सांगितले. नियोजन समितीच्या निवडणुकीत काँग्रेसमधील गटबाजी उफाळून आली होती. काँग्रेसला संख्याबळानुसार आलेल्या जागा वाटपातही डॉ. पतंगराव कदम गटाचे वर्चस्व कायम राहिले. सर्वसाधारण गटातील उमेदवारीवरुन गटनेते देशमुख नाराज होेते, त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु राजीनामा दिला नसल्याचे जिल्हाध्यक्ष कदम यांनी स्पष्ट केले.यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर, काँग्रेसचे विक्रम सावंत उपस्थित होते.