लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : कऱ्हाड (जि. सातारा) येथे जाण्यासाठी रेल्वे रुळाजवळून छोट्याशा पायवाटेने जात असलेल्या दोघी सख्ख्या बहिणींना भरधाव रेल्वेने जोराची धडक दिली. माधवनगर (ता. मिरज) येथे रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली. यामध्ये सुरेखा प्रदीप शिंगटे (वय ५५, रा. राजनगर, चिंतामणीनगर, सांगली) या जागीच ठार झाल्या; तर त्यांची बहीण जोत्स्ना अशोक जाधव (५०, अंबरनाथ मुंबई, सध्या मिरज) या गंभीर जखमी आहेत. कऱ्हाड येथे शुक्रवारी एका नातेवाईकाचा अमृतमहोत्सवी कार्यक्रम होता. यासाठी सुरेखा शिंगटे व ज्योत्स्ना जाधव जाणार होत्या. सकाळी साडेसहाच्या कोल्हापूर-पुणे पॅसेंजर रेल्वेने जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. ज्योत्स्ना जाधव गुरुवारी सायंकाळीच सुरेखा यांच्या घरी मुक्कामास आल्या होत्या. दोघीही पहाटे पावणेसहा वाजता घरातून निघाल्या. माधवनगर रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी त्या शांतिनिकेतन लोकविद्यापीठामार्गे गेल्या. या मार्गावर स्थानकापर्यंत जाण्यासाठी लहानशी पायवाट आहे. रुळाच्या दोन्ही बाजूने काटेरी झुडूपे आहेत. स्थानक जवळ आल्यानंतर समोरुन मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस भरधाव वेगाने येत होती. याचदरम्यान काटेरी झाडाची फांदी चुकविण्याच्या प्रयत्नात दोघीही थोड्या रुळाकडे सरकल्या. त्याचवेळी त्यांना रेल्वेची जोराची धडक बसली. ही धडक एवढी भीषण होती की, सुरेखा शिंगटे पंधरा ते सोळा फूट उडून शेतात जाऊन पडल्या, तर जोत्स्ना जाधव याही गंभीर जखमी झाल्या.सकाळची वेळ असल्याने या मार्गावर प्रवाशांची फारशी वर्दळ नव्हती. रेल्वे चालकाने सांगली स्थानकावर याबाबत माहिती दिली. रेल्वे पोलिसांनी संजयनगर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर संजयनगरचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमी जोत्स्ना जाधव यांना उपचारार्थ मिरजेतील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच त्यांचे नातेवाईकही दाखल झाले. सुरेखा शिंगटे यांच्या मृतदेहाची शासकीय रुग्णालयात विच्छेदन तपासणी करुन तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रेल्वेच्या धडकेने ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. आवाज आणि वारेरुळापासून छोट्याशा पायवाटेने जाताना काटेरी झाडाची फांदी चुकविण्याचा प्रयत्न केल्याने सुरेखा शिंगटे यांना रेल्वेची धडक बसली, तर याचवेळी जवळून वेगाने रेल्वे गेल्याने त्याच्या वाऱ्याने व हॉर्न मोठ्या प्रमाणात वाजल्याने जोत्स्ना जाधव घाबरून गोंधळून गेल्या. त्यामुळे त्यांनाही धडक बसली. महालक्ष्मी एक्स्प्रेस माधवनगर स्थानकावर थांबत नाही. त्यामुळे ती येथून भरधाव निघून गेली.
सख्ख्या बहिणींना रेल्वेची धडक
By admin | Published: May 26, 2017 11:08 PM