सांगली जिल्ह्यात साठ ग्रामपंचायतींवर सर्वच पक्षांची करडी नजर, तुल्यबळ लढती होणारी गावे जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 01:21 PM2022-12-13T13:21:01+5:302022-12-13T13:25:22+5:30

ग्रामपंचायतींवर वर्चस्व ठेवण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, बाळासाहेबांची शिवसेना व शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्यांनी कंबर कसली आहे.

All the parties are eyeing sixty gram panchayats in Sangli district | सांगली जिल्ह्यात साठ ग्रामपंचायतींवर सर्वच पक्षांची करडी नजर, तुल्यबळ लढती होणारी गावे जाणून घ्या

सांगली जिल्ह्यात साठ ग्रामपंचायतींवर सर्वच पक्षांची करडी नजर, तुल्यबळ लढती होणारी गावे जाणून घ्या

Next

सांगली : थेट सरपंचपदामुळे मोठ्या लोकसंख्येच्या ६० ग्रामपंचायतींवर वर्चस्व ठेवण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, बाळासाहेबांची शिवसेनाशिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. सर्वच स्थानिक आघाड्यांनी सरपंचपदाचे तुल्यबळ उमेदवार दिले असून आर्थिक रसदही पुरविली जात आहे. यामुळे ग्रामपंचायत निवडणुका लक्षवेधी होत आहेत. सध्या प्रचार शिगेला पोहोचला आहे.

जिल्ह्यातील ४४७ ग्रामपंचायतींसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका घोषित केल्या होत्या. यापैकी पाच गावांतील निवडणुकांना स्थगिती मिळाली असून २८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. कडेगाव तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींनी निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. यामुळे सध्या ४१२ ग्रामपंचायतींसाठी रणधुमाळी सुरू आहे. जिल्ह्यातील ६० ग्रामपंचायतींच्या निवडणुका सर्वच पक्षांच्या नेत्यांनी प्रतिष्ठेच्या केल्या आहेत.

निवडणुकांच्या दृष्टीने ही निर्णायक गावे

माधवनगर, बुधगाव, दिघंची, खरसुंडी, वायफळे, मणेराजुरी, वाळवा, बागणी, अंकलखोप, बाेरगाव, कामेरी, वांगी, कडेपूर, डफळापूर, वाळेखिंडी, उमेदी, संख, कोकरुड, मांगले या सर्वाधिक मोठ्या ग्रामपंचायती असून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या दृष्टीने ही निर्णायक गावे आहेत. यामुळे राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, बाळासाहेबांची शिवसेना व शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्यांनी या गावांतील निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या आहेत.

जयंत पाटील यांच्याच गटांमध्ये लढती

वाळवा तालुक्यातील बाेरगाव आणि कामेरीत सरपंचपदाची निवडणूक तर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य लढवत आहेत. वाळवा येथील बालेकिल्ला शाबूत ठेवण्याचे मोठे आव्हान हुतात्मा संकुलासमोर आहे. वाळवा तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप, तर काही गावांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याच गटांमध्ये लढती होत आहेत.

नेत्यांचे तगडे आव्हान

शिराळा, कडेगाव, पलूस, तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज, जत तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादीत चुरस आहे. खानापूर, आटपाडी तालुक्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आमदार अनिल बाबर यांच्या माध्यमातून तयारीत आहे. या गटाला खानापूर, आटपाडी तालुक्यांत भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या नेत्यांनी तगडे आव्हान दिले आहे.

या ठिकाणच्या लढतींकडे लक्ष

मिरज तालुका : बेडग, कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, सोनी, बुधगाव, माधवनगर, सलगरे, बामणोली, समडोळी. 

खानापूर : लेंगरे, आळसंद. 

आटपाडी : दिघंची, झरे, खरसुंडी. 

तासगाव : अंजनी, मणेराजुरी, सावर्डे, वायफळे. 

कवठेमहांकाळ : आरेवाडी, शिरढोण, रांजणी, बोरगाव, नागज. 

पलुस : दुधोंडी, बुर्ली, अंकलखोप, ब्रह्मनाळ. 

वाळवा : कासेगाव, वाटेगाव, नेर्ले, येडेमच्छिंद्र, ताकारी, बोरगाव, पेठ, रेठरे धरण, ऐतवडे बुद्रुक, चिकुर्डे, कुरळप, येडेनिपाणी, कणेगाव, वाळवा, गोटखिंडी, कोरेगाव, शिगाव, बागणी, 

कडेगाव : वांगी, देवराष्ट्रे, कडेपूर, तडसर. 

जत : डफळापूर, वाळेखिंडी, माडग्याळ, उमदी, संख. 

शिराळा : आरळा, कोकरुड, सागाव, मांगले.

गृहभेटींवर उमेदवारांचा भर

प्रत्यक्ष मतदारांच्या घरी भेट देण्यावर उमेदवार भर देत आहेत. पॅनलचे सर्व सदस्य गावातील प्रत्येक घर पिंजून काढत आहेत. त्यामुळे, ग्रामीण भागात सध्या यात्रेचे स्वरूप आले आहे. एक उमेदवार गेल्यानंतर दुसरा उमेदवार त्याच भागात येत असल्याचे दिसत आहे.

Web Title: All the parties are eyeing sixty gram panchayats in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.