माडग्याळ : गुड्डापूर (ता.जत ) येथील श्री दानम्मा देवस्थान ट्रस्टचा कारभार पारदर्शक असून भ्रष्टाचाराचा आरोप सूडबुध्दीने केला जात आहे, असा दावा देवस्थानचे अध्यक्ष प्रकाश गणी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केला आहे.
प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, श्री दानम्मादेवी देवस्थान ट्रस्टची सार्वजनिक विस्वस्त कायद्याखाली नोंदणी झाली आहे. ट्रस्टमध्ये दोन हजार सभासद आहेत. देवस्थानचा कारभार सभासदांनी निवडून दिलेल्या विश्वस्तांमार्फत केला जातो. संस्थेचे सात विस्वस्त असून आजपर्यंत स्वच्छ व पारदर्शक कारभार केला आहे. हिशोब चोख ठेवला आहे. दर वर्षी सनदी लेखापालाकडून लेखापरीक्षण करून घेऊन मुदतीत धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे सादर केला जातो.
बसवमंतप्पा पुजारी हे पुजारी म्हणून आहेत. त्यांच्या पूजेच्यावेळी भक्तांनी ठेवलेले दान ते पेटीत न टाकता ते पिशवीत भरून स्वत:साठी घेतल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे. भक्तांनी दिलेली देणगी अनधिकृतपणे घेतल्याने त्यांना पूजेच्या कामावरून निलंबित का करू नये अशी नोटीस दिली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत निर्देश मिळविण्यासाठी सह धर्मादाय आयुक्तांकडे कळविले आहे.
बसवंतप्पा पुजारी यांचे पुतणे गुरूराज पुजारी हे संस्थेकडे नोकरीला होते व देवीचे व देवीचे व्हॅल्युएशन केलेले दागिने विक्रीचे कारभार पाहत होते. संस्थेचे तत्कालीन विश्वस्त समवेत व इतर विश्वस्तांनी अचानक तपासणी केली असता सोन्याचे दागिने विक्रीत तफावत आढळून आली. त्यामुळे त्यांना कामावरून कमी केले आणि तफावतीची रक्कम वसूल केली. याचा राग मनात धरून पुजारी यांनी सूडबुध्दीने संस्थेला त्रास देण्याच्या हेतुने विश्वस्तांवर बिनबुडाचे आरोप व खोटी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची पोलिसांमार्फत चौकशी सुरू आहे. त्यात सत्य बाहेर येणारच आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
चाैकट
भक्ताची देणगी अन् वाद
कर्नाटकातील एका भक्ताने दान देवीपुढे ठेवले होते. त्या भक्ताने संस्थेकडे देणगी पावती मागितल्यावर पुजारी यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी पैसे संस्थेकडे जमा केले नसल्याने पुढे आले. त्यांच्या ४० टक्के हिश्शातून वजा करून वसूल करण्यात आले.