आष्टा : राज्यात सर्वत्र दुष्काळ आहे. सांगली जिल्ह्यातील काही भागाला पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. पोखर्णी येथील महिला व ग्रामस्थांना गावविहिरीला पाणी कमी झाल्याने दुष्काळाचे चटके बसत असताना नागाव-पोखर्णीसह पाणी पुरवठा संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार पाटील व संचालक दत्तात्रय दादू पाटोळे यांनी स्वखर्चाने गावकऱ्यांना पाणी देत आदर्श घालून दिला आहे.वाळवा तालुक्यातील पोखर्णी छोटेसे खेडेगाव. या गावाला मागील अनेक वर्षांपासून उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी गावकऱ्यांना वणवण करावी लागत होती. गावातील शेतीला पाण्यासाठी दोन सहकारी व दोन खासगी पाणी संस्था आहेत. मात्र गावात पाणी नसल्याने गावाजवळूनच जाणाऱ्या नागाव-पोखर्णी पाणी पुरवठा संस्थेच्या पोखर्णी येथील सभासदांची बैठक झाली. या बैठकीत सामाजिक बांधिलकीतून गावाला पाणी देण्याचे ठरवण्यात आले. गाव विहिरीत पाणी सोडण्याऐवजी गावात विविध ठिकाणी पाईपलाईनद्वरे नळ काढून पाणी देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. मुख्य पाईपलाईनपासून सुमारे २ हजार फूट पाईपलाईन करण्याचे ठरले. संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार पाटील, दत्तात्रय पाटोळे यांनी स्वखर्चातून पाईपलाईन पूर्ण केली. अध्यक्ष धोंडीराम जासूद, कुमार पाटील, रघुनाथ जासुद, रघुनाथ मंडले, भानुदास पाटील, संभाजी पाटील, बाळासाहेब बादटे, नागनाथ जाधव, रमेश आवळे, अरविंद पाटील, पोपट पाटोळे, रघुनाथ सुतार, रघुनाथ जाधव, शामराव जाधव उपस्थित होते. पाणी मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या उपक्रमाचे आ. जयंत पाटील यांनी कौतुक केले आहे. (वार्ताहर)
ऐन दुष्काळात ‘पोखर्णी’करांना स्वखर्चाने पाण्याचे वाटप
By admin | Published: April 07, 2016 11:06 PM