मिरज : सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना लॉटरी पद्धतीने साडेपाच कोटी रुपयांची कामे देण्यात आली. त्यासाठी आयोजित बैठकीला जिल्हाभरातून दीडशे अभियंते उपस्थित होते. ७६ अभियंत्यांना कामे मिळाली.
जत, कवठेमहांकाळ, वाळवा, खानापूर, आटपाडी, शिराळा तालुक्यांत २५१५ लेखाशीर्षाखाली ही कामे केली जात आहेत. इतक्या मोठ्या किमतीची कामे बऱ्याच वर्षांनी वाटण्यात आली. गेल्या महिन्यात प्रशासनाने एकच काम वाटपासाठी ठेवल्याने अभियंता संघटनेने तक्रार केली होती. त्याची दखल घेत कामांची संख्या वाढविण्यात आली. मिरज, सांगलीसह पलूस, कडेगाव तालुक्यांतील कामे पुढील बैठकीत काढण्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता संतोष रोकडे यांनी संघटनेला दिले. जतसाठी २ कोटी ४४ लाखांची ३१ कामे, कवठेमहांकाळसाठी १ कोटी ८६ लाखांची ३० कामे, वाळव्यासाठी १८ लाखांची तीन कामे देण्यात आली. खानापूरसाठी सात लाखांचे एक काम, शिराळ्यासाठी ८० लाखांची ८ कामे व आटपाडीसाठी ३० लाखांची तीन कामे काढण्यात आली.