लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : गेल्या दीड महिन्यापासून विटा येथील व्यापाऱ्यांनी शासनाचा आदेश पाळून दुकाने बंद केली. आता सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत काही व्यवसाय सुरू केले, तसेच उर्वरित व्यावसायिकांनाही शासनाचे सर्व नियम व अटी पाळून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी विटा व्यापारी संघटनेने प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
विटा शहरात कोरोनाची रुग्णसंख्या घटत आहे. त्यामुळे शासनाने व्यापारी आणि कामगारांचे अतोनात होणारे नुकसान लक्षात घेऊन व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी यावेळी व्यापाऱ्यांनी प्रशासनाकडे केली.
मागील लॉकडाऊनमध्ये बँकांनी व्यापाऱ्यांच्या कर्जावरील व्याज थांबविले होते; परंतु आजच्या परिस्थितीत व्यापाऱ्यांचे बँकांचे कर्जाचे व्याज चालू आहे. हे व्याज भरण्यास व्यापारी असमर्थ आहेत. व्यवसाय बंद असूनही कामगारांचा पगार द्यावा लागत आहे. गाळाभाडे आणि वीज बिल भरावे लागत आहे. वेळेचे बंधन देऊन व्यवसायास परवानगी दिल्यास नियम व अटी सर्व व्यापारी पाळून शासनास सहकार्य करण्यास तयार आहोत, असे यावेळी व्यापाऱ्यांनी सांगितले.
याबाबतचे निवेदन माजी आमदार सदाशिवराव पाटील, प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषिकेश शेळके, मुख्याधिकारी अतुल पाटील यांना देण्यात आले. यावेळी प्रताप सुतार, भरत मुळीक, किरण साळुंखे, प्रवीण टेके, शरद देवकर, शरद रोकडे यांच्यासह व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट
पालकमंत्र्यांशी चर्चा करणार
जेथे कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे, तेथे शासकीय नियमांचे पालन करून दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी आणि बँकेचे व्याज माफ करावे, यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी बोलून निर्णय व्हावा, अशी मागणी व्यापारी संघटनेने केली असून, त्यावर पालकमंत्र्यांशी बोलून सकारात्मक निर्णय घेण्याबाबत चर्चा करू, असे आश्वासन माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी दिले.