सांगली : सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे पूरस्थिती ओढवली आहे. विशेषत: धरणक्षेत्रातील संततधारेने नद्यांनी पात्र सोडले आहे. विशेष म्हणजे या स्थितीत कर्नाटकातील अलमट्टी धरण अद्याप ७४ टक्केच भरले आहे.
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील महापुरासाठी अलमट्टी धरणावर खापर फोडले जात असल्याच्या स्थितीत ही स्थिती लक्षात घेण्यासारखी आहे. महापुराचा अभ्यास करणाऱ्या वडनेरे समितीने अलमट्टीचा मुद्दा खोडून काढला आहे, शिवाय कर्नाटक सरकारनेही तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे मान्य केलेला नाही. गेल्या चार दिवसांपासून सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पुराचे थैमान सुरू असताना अलमट्टी धरण मात्र अजूनही भरलेले नाही याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. राजापूूर बंधाऱ्याची धोकापातळी ५८ फूट आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजता ती ४१.३ फूट होती, त्यावेळीही कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरू होते. अर्थात, राजापुरातील पाणीस्थिती पूर्णत: नियंत्रणात असतानाही कोल्हापूरला पुराचा तडाखा बसला होता, त्यामुळे स्थानिक स्तरावरील धुवाधार पावसामुळेच सांगली, कोल्हापूर जिल्हे पुराने वेढले जातात हे स्पष्ट झाल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. शुक्रवारी सांगली, कोल्हापूर शहरांत पूरस्थिती असताना राजापूर व अलमट्टीची पाणीपातळी पूर्णत: नियंत्रणात होती याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. महिन्याभरापूर्वी महाराष्ट्राच्या जलसंपदाचे पथक कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटले, तेव्हादेखील अलमट्टीचा दावा तांत्रिक मुद्द्यांसह फेटाळण्यात आला होता.
दक्षिण महाराष्ट्रातील सध्याचा पाऊस विक्रमी आहे. चांदोली धरणात २४ तासांत ५०२ मिलीमीटर पाऊस झाला. कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात नवजा येथे २४ तासांत ७३१ मिमी पाऊस झाला, त्यामुळे कोयनेचा पाणीसाठा शुक्रवारी पहाटे तीनपर्यंतच्या २४ तासांत १२ टीएमसीने वाढला. हा विक्रमी पाऊस धरणात साठवता येत नाही, तो थेट सांगलीला पुराच्या रूपाने कवेत घेतो.
चौकट
शिरोळला धोका, पण अतिवृष्टीमुळेच
सांगली जिल्ह्यात सांगली शहर वगळता पुढे कोठेही कृष्णेने पात्र सोडलेले नाही. अलमट्टीचा फुगवटा सांगलीपर्यंत पोहोचत असता तर राजापूरपासून म्हैसाळपर्यंतच्या अनेक गावांत आतापर्यंत पाणी शिरले असते. पात्र दुथडी भरले असले तरी तेथे पूरस्थिती नाही. सांगलीतील पूरस्थितीला कोयना व चांदोेलीतील विक्रमी पाऊसच कारणीभूत ठरला आहे. शिरोळमध्येही २०१९ पेक्षा गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता तहसीलदारांनी व्यक्त केली आहे. अलमट्टी भरलेले नसतानाही शिरोळ पुरात जातेय, याचे कारण अतिवृष्टीच असल्याचे स्पष्ट झाले आहे.