बोरगाव : बोरगाव, ताकारी, भवानीनगर परिसरात गेली तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने शेतकऱ्यांची खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीची लगबग सुरू झाली आहे.
बोरगाव, ताकारी, भवानीनगर, रेठरेहरणाक्ष, दुधारी, जुनेखेड, नवेखेड, मसुचीवाडी, डुकेवाडी, फार्णेवाडी परिसरात संततधार पाऊस पडत आहे. या पवसाने शेतात पेरणीयोग्य परिस्थिती निर्माण झाल्याने भात, सोयाबीन, भुईमूग, मूग, चवळी, घेवडा यांची पेरणी करण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. आडसाली ऊसलावणीचीही मोठ्या प्रमाणात लगबग सुरू झाल्याचेही दिसत आहे.
एकाच वेळी अनेक शेतकऱ्यांनी टोकणी व लावणीस सुरुवात केल्याने मजूरांचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. परंतु जोपर्यंत १०० मिलिमीटर पाऊस होत नाही तोपर्यंत ऊसलावण व टोकणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी गडबड करू नये, असा सल्ला कृषी विभागातील तज्ज्ञांनी दिला आहे.