अजित पवार यांना घरात फूट पडल्याची चूक कळली असली तरी.., जयंत पाटील यांनी स्पष्टच सांगितले

By अविनाश कोळी | Published: September 14, 2024 05:19 PM2024-09-14T17:19:38+5:302024-09-14T17:21:23+5:30

'''ती' चूक आता भाजपवाले करणार नाहीत''

Although Ajit Pawar has realized the mistake of division in the house, Jayant Patil clearly said | अजित पवार यांना घरात फूट पडल्याची चूक कळली असली तरी.., जयंत पाटील यांनी स्पष्टच सांगितले

अजित पवार यांना घरात फूट पडल्याची चूक कळली असली तरी.., जयंत पाटील यांनी स्पष्टच सांगितले

सांगली : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घरात फूट पडल्याची चूक कळली असली तरी त्यांच्या डोईवर ‘ती’ टांगती तलवार अजून कायम आहे. त्यामुळे त्यांना महायुतीतून लढण्याशिवाय पर्याय नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

सांगलीत पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, अजित पवार आता कोणतीही वेगळी भूमिका घेऊ शकत नाहीत. जी टांगती तलवार त्यांच्या डोईवर लटकत असल्यामुळे त्यांनी महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला ती तलवार अजून हटलेली नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते कोणताही वेगळा निर्णय घेऊ शकत नाहीत. विधानसभेच्या तोंडावर पुन्हा सीबीआय, ईडीच्या धाकाने नव्या राजकीय खेळ्या करण्याची चूक आता भाजपवाले करणार नाहीत. अशा यंत्रणांचा कशासाठी वापर होतोय, हे लोकांना कळाले आहे. त्यामुळे अगोदरच लोकांच्या मनातून उतरल्यानंतर आता अशा कारवाईच्या माध्यमातून ते आणखी खाली उतरतील, असे मला वाटत नाही.

लाडकी बहीण योजना ही केवळ निवडणुकीसाठीच काढली आहे. ‘अति तिथे माती’ या म्हणीप्रमाणे सरकारची अवस्था होईल. पैसे वाटपाच्या योजनेतून राज्याला आणखी आर्थिक संकटात टाकले जात आहे. विकासकामांसाठी दिल्या जाणाऱ्या निधीला कात्री लावली आहे. भविष्यात एक रुपयासुद्धा विकासकामांना मिळणार नाही. राज्यातील महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा किंवा धोरण ठरलेले नाही. योग्यवेळी धोरण ठरेल.

न्यायव्यवस्थेबद्दल साशंकता

जयंत पाटील म्हणाले, देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आरतीला येतात, यातून न्यायव्यवस्थेबद्दल साशंकता व्यक्त होत आहे. न्यायव्यवस्थेचे कोणतेही संकेत पाळले जात नसल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोणत्याही पुराव्याशिवाय इतके महिने तुरुंगात टाकले जात असेल तर न्यायाची अपेक्षा कशी करायची, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सीसीटीव्ही गायब होणे गंभीर

‘हीट ॲण्ड रन’ प्रकरणात बावनकुळे यांच्या मुलाचा समावेश आहे की नाही, याची मला माहिती नाही. मात्र, या प्रकरणातील सीसीटीव्ही फूटेज गायब होणे, ही बाब गंभीर आहे, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

Web Title: Although Ajit Pawar has realized the mistake of division in the house, Jayant Patil clearly said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.