अशोक पाटील -- इस्लामपूर श्रावण व नवरात्रोत्सवात येथील अंबाबाई मंदिरात महिला मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात. या देवस्थानच्या व्यवस्थेसाठी नोंदणीकृत ट्रस्ट स्थापन करण्यात आला आहे. पूजेचा मान गुरव समाजाला आहे. मात्र काही बाहेरची मंडळी येथे शिरकाव करत आहेत. मंदिरात देणगी व दान स्वरूपात मिळणाऱ्या रकमेमध्ये लाखो रुपयांचा घोळ होत असल्याची चर्चा आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी अंबाबाई मंदिर आहे. या देवस्थानची ३५ एकर जमीन मंदिराच्या व्यवस्थेसाठी गुरव समाजाकडे देण्यात आली आहे. या जमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून दैनंदिन पूजाअर्चा, मंदिराची डागडुजी, इतर खर्च करण्याची जबाबदारी गुरव समाजाकडे आहे, परंतु या समाजाने यातील काही जमीन विकल्याची चर्चा आहे. सध्या या जमिनीचे दर कोट्यवधीच्या घरात आहेत. जमिनीतून येणाऱ्या उत्पन्नातील एकही पैसा मंदिरासाठी खर्च केला जात नाही. शिवाय श्रावण आणि नवरात्रोत्सवात मिळणारे दान, देणग्या या स्वरूपात लाखो रुपये गोळा होतात. त्याचा आजपर्यंत कोणीही हिशेब जाहीर केलेला दिसून येत नाही.या मंदिरावर नोंदणीकृत ट्रस्ट कार्यरत आहे. ट्रस्टचे अध्यक्ष सखाराम जाधव आहेत, तर सदस्यपदी एस. के. कुलकर्णी, पोलीसपाटील बाळासाहेब पाटील, अॅड. अभिजित परमणे, वीरेंद्र देसाई, गणेश कुंभार, तसेच काही निमंत्रित सदस्य आहेत. या सदस्यांनी लाखो रुपये खर्च करुन मंदिराचे सुशोभिकरण केले आहे. गेल्या ४0 वर्षांपासून वीज, पाणीपट्टी, घरपट्टी याचाही खर्च ट्रस्टच्या नावेच टाकला जातो. लग्न व इतर धार्मिक कार्यक्रमातून मिळणारे उत्पन्न ट्रस्टकडे जमा होते. यातील पै-पैचा हिशेब ट्रस्टकडे असल्याचा दावा सदस्य करीत आहेत.याउलट आतापर्यंत दानपेटीमध्ये जमा झालेले लाखो रुपये गुरव समाजाने हडप केल्याची चर्चा आहे. याचा हिशेब ट्रस्टला देणे आवश्यक आहे. परंतु गुरव समाजच ट्रस्टला मानत नसल्याचा दावा काही मंडळी करीत आहेत. ट्रस्ट व गुरव समाजाव्यतिरिक्त काहीजण नवरात्रोत्सवाच्या काळात नवचंडी होम, महाप्रसादाच्या नावाखाली भाविकांकडून मोठ्या प्रमाणात वर्गणी गोळा करतात. याचाही हिशेब दिला जात नाही. काही महिला भाविकांनी देवीच्या दागिन्यांसाठी गोळा केलेल्या पैशाचा हिशेब न दिल्याने, त्यातही गोलमाल झाल्याचे बोलले जात आहे. देवीसाठी मंदिर समितीकडे किती दागिने, अलंकार आहेत, याचा खुलासा जाहीरपणे होत नाही. मंदिरातून मिळणाऱ्या उत्पन्नात वाटेकरी जास्त झाले आहेत, त्यामुळेच मंदिराचा विकास दिवसेंदिवस रखडत चालला आहे.गर्दीमुळे धास्ती : महिला पोलीस नेमावेतसध्या नवरात्रोत्सव सुरू असल्यामुळे अंबिका मंदिरात मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी असते. गर्दीचा फायदा घेऊन दागिने लुटीच्या अनेक घटना यापूर्वी शहरात घडल्या आहेत. महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने पळविणारी टोळी सध्या इस्लामुरात सक्रिय असल्याने, येथे किमान दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी महिला भाविकांतून होत आहे.ट्रस्टच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशातून आम्ही देवालयाचा विकास करत आहोत. मंदिरासाठी असलेल्या ३५ एकर जमिनीतून येणारे व गाभाऱ्यातील दानपेटी-देणगीतून मिळणारे उत्पन्न ट्रस्टला मिळत नाही. याव्यतिरिक्त काहींनी पावतीरूपाने गोळा केलेल्या पैशाचा हिशेबही ट्रस्टला सादर केला जात नाही.- सखाराम जाधव, अध्यक्ष, अंबिका देवालय जीर्णोध्दार ट्रस्ट.
अंबामाता एक; भक्तांना लुटणारे अनेक
By admin | Published: October 14, 2015 11:28 PM