लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : नगरपालिकेतील मागील सत्ताधारी राष्ट्रवादीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराचे सुशोभिकरण अर्ध्यावरच ठेवले होते. आताच्या सत्ताधारी विकास आघाडीने ते पूर्ण केले. त्यानंतर तेथील भिंतीवर सत्ताधाऱ्यांतील काही नगरसेवकांनी रात्रीत नावाचे फलक लावले, तर विरोधी राष्ट्रवादीने ताबडतोब विरोध करीत पोलीस बंदोबस्तात हे फलक काढले. यातून दोन्ही गटांमध्ये श्रेयवाद रंगला आणि तो चव्हाट्यावरही आला.
मागील सत्ताधारी राष्ट्रवादीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराच्या सुशोभिकरणासाठी लाखो रुपये खर्च केले. हे काम सुरू असताना अनेक अडथळे आले. यानंतर विकास आघाडीची सत्ता आली. आघाडीने सुशोभिकरणाचे काम पूूर्ण केले. परंतुु उद्घाटन झाले नाही. त्यामुळे विकास आघाडीचे नगरसेवक वैभव पवार, कोमल बनसोडे आणि काही कार्यकर्त्यांनी मिळून या पुतळ्याजवळच्या भिंतीवर सोमवारी रात्री विद्यमान नगरसेवकांच्या नावाचा आणि भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचा फलक लावला. विरोधी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना हे कळल्यानंतर उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील, सभापती विश्वनाथ डांगे तेथे दाखल झाले. यावेळी दोन्ही गटांच्या नगरसेवकांत शाब्दिक चकमक झाली. पोलीस आणि पालिका प्रशासनाचे अधिकारीही तेथे आले आणि लावलेला संविधानाचा प्रास्ताविक फलक वगळता इतर फलक काढले.
याबाबत मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, माहिती घेऊन सांगतो. विकास आघाडीचे पक्षप्रतोद विक्रम पाटील यांनी याबाबत कसलीही कल्पना नसल्याचे सांगितले.
कोट
सत्ताधारी विकास आघाडीतील काही नगरसेवकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्यावरच नावाचे फलक लावले. ते लावताना पुतळा समितीमधील सदस्यांचा विचार केला नाही किंवा हे फलक लावण्यासंदर्भात पालिकेत ठराव केलेला नाही. हे सर्व फलक बेकायदेशीरपणे लावण्यात आले. याला आमचा विरोध आहे.
- अरुण कांबळे, अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती
कोट
मागील सत्ताधारी राष्ट्रवादीने राजारामबापू नाट्यगृह व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे उद्घाटन करून तेथे त्यावेळच्या सर्वच नगरसेवकांच्या नावाचे फलक लावले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुुतळ्याचे सुुशोभिकरणाचे काम विकास आघाडीने पूर्ण केले आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांच्या नावाचा फलक लावला. यामध्ये वेगळे काय आहे?
-वैभव पवार, नगरसेवक, विकास आघाडी