सांगली : क्रीडांगणे, शाळांची आरक्षणे उठविण्याचा डाव महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे लोक आखत असून, तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. त्यांनी ताकदीच्या जोरावर असे ठराव केले, तर सुधार समितीमार्फत भाजप नेत्यांच्या कार्यालयांमध्ये क्रीडा स्पर्धा भरविण्याचे आंदोलन छेडू, असा इशारा समितीचे अॅड. अमित शिंदे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला.
ते म्हणाले की, विश्रामबाग परिसरात खुल्या नाट्यगृहासाठी क्रीडांगणाचे आरक्षण रद्द करण्याचा प्रयत्न महापालिकेतील सत्ताधारी भाजपने सुरू केला आहे. वास्तविक विश्रामबाग परिसरात एक खुले नाट्यगृह असताना त्याकडे दुर्लक्ष करून दुसरे नाट्यगृह उभारण्याची काय गरज आहे? ते उभारण्यासाठी क्रीडांगणाचे आरक्षण रद्द करण्याची गरज काय? भाजपच्या जाहीरनाम्यात काही गोष्टी घेतल्या म्हणून त्यासाठी कोणतीही बेकायदेशीर कृती आम्ही होऊ देणार नाही.
दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने असलेले नाट्यगृह दुरुस्त करण्यासाठी भाजपचे पदाधिकारी किंवा नेते काही बोलत नाहीत. मिरजेच्या बालगंधर्व नाट्यगृहातील त्रुटी दूर करून ते अधिक चांगले करण्याचा प्रयत्न होत नाही. दुसरीकडे एकाच भागात खुले नाट्यगृह उपलब्ध असताना, तिथे दुसरे उभारण्यासाठी आरक्षण उठविण्याचा घाट घातला जात आहे.
एका भागात दोन भाजी मंडई अस्तित्वात असताना पुन्हा तिसरी भाजी मंडई उभारण्याचा प्रयत्नही केला जात आहे. त्यासाठीही आरक्षण उठविण्याचा प्रयत्न होत आहे. विस्तारित भागाांमध्ये भाजी मंडईची गरज असताना अशा कोणत्याही भागाचा विचार सत्ताधारी करीत नाहीत. याऊलट स्वत:च्या सोयीसाठी व जाहीरनाम्यातील गोष्टी पूर्ण व्हाव्यात म्हणून कोणत्याही थराला जाण्याचा प्रयत्न केला जात आहे.
शाळा व क्रीडांगणांची आरक्षणे उठविण्याचा अधिकार कोणालाही नाही. असा प्रयत्न झाल्यास संबंधितांना न्यायालयात खेचण्याबरोबरच त्यांच्याविरोधात आंदोलन छेडण्यात येईल. जनतेने भाजपला निवडून दिले आहे, त्यामुळे त्यांनी जनतेला विचारूनच सर्व गोष्टी केल्या पाहिजेत. मनमानी व हुकूमशाही पद्धतीने त्यांचा कारभार आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी जयंत जाधव उपस्थित होते.विरोधक गप्प का?महापालिकेतील विरोधी पक्षसुद्धा आरक्षणाच्या विषयावर गप्प का आहेत? त्यांची भूमिका पाहिली तर सत्ताधाऱ्यांशी त्यांनी याप्रश्नी संगनमत केले आहे का, अशी शंका येत आहे, असे अमित शिंदे यावेळी म्हणाले.