भाजप प्रवेशाच्या चर्चेनंतर अमित देशमुखांनी दाखवला "बाभळगावचा वाडा"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 04:05 PM2023-01-13T16:05:51+5:302023-01-13T16:06:23+5:30

येथील कार्यक्रमात बसलेल्या काही भाजप नेत्यांकडे पाहात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

Amit Deshmukh showed "Bablgaon Castle" after the discussion of BJP entry. | भाजप प्रवेशाच्या चर्चेनंतर अमित देशमुखांनी दाखवला "बाभळगावचा वाडा"

भाजप प्रवेशाच्या चर्चेनंतर अमित देशमुखांनी दाखवला "बाभळगावचा वाडा"

googlenewsNext

सांगली - राज्यातील राजकारणात कधी कोण कोणत्या पक्षात जाईल आणि राजकारणात काय घडेल हे सांगता येणार नाही. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी काँग्रेसने उमेदवारी दिल्यानंतरही सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. तर, त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे भाजपनेही येथे उमेदवार दिला नाही. त्यामुळे, भाजप सत्यजित तांबेंना पाठिंबा देणार का? याची चर्चा रंगली आहे. दुसरीकडे लातूरचे आमदार आणि काँग्रसचे नेते अमित देशमुख यांच्याही भाजप प्रवेशाच्या चर्चा होत आहेत. मात्र, सांगलीतील विटा येथे बोलताना एका कार्यक्रमात त्यांनी या चर्चांना थेट देशमुख वाडाच दाखवला. 

येथील कार्यक्रमात बसलेल्या काही भाजप नेत्यांकडे पाहात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ही सगळीच मंडळी, खरंतर तुम्ही मला तुमच्या घरी या म्हणताय, पण तुम्हीच स्वगृही परत या, असे म्हणत काँग्रेस नेते आणि माजी आमदार अमित देशमुख यांनी भाजपमधील प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला. 
देशमुख यांनी अनेकांना बाभळगावातील देशमुखांचा वाडा दाखवला. तसेच, विट्यातील बर्वे वाड्यातून माझ्या संकल्पनेवर निश्चितच शिक्कामोर्तब होईल, याबाबत माझ्या मनात शंका नाही. कितीही वादळं आली, वारे आले तरी बर्वे वाडा हा तिथंच आहे. तसंच, लातूरचा देशमुख वाडा हाही कितीही वादळं आली, कितीही वारे आले तर तिथंच राहणार, असे म्हणत अमित देशमुख यांनी आपण काँग्रेससोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले. 

लातूरचं देशमुख घराणं हे संस्काराने श्रीमंत आहे, श्रीमंती ही संस्कारातच असायला हवी. सध्याच्या राजकारणावर भाष्य करताना, खरं तर कोण कोणत्या पक्षात आहे हे तुम्हाला तरी कळतं का? असा सवालच त्यांनी जनतेला उद्देशून केला. तसेच, राज्यातील हे सध्याचं तिसरं सरकार आहे. पहिलं सरकार अडीच दिवस चाललं, दुसरं अडीच वर्षे चाललं तिसरं किती दिवस चालेल हे सांगता येणार नाही आणि चौथं सरकार कधी येईल हेही कुणाला माहिती नाही. सध्या शांतता कोर्ट सुरू होत आहे... असे म्हणत अमित देशमुख यांनी राज्यातील राजकारणावर भाष्य केलं. मात्र, आपण काँग्रेसमध्येच असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 
 

Web Title: Amit Deshmukh showed "Bablgaon Castle" after the discussion of BJP entry.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.