सांगली : कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलप्रकरणी संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल असूनही त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात येत नाही. भिडे, एकबोटेंवरील लक्ष विचलित करण्यासाठीच भाजप सरकारने ‘एल्गार’ परिषदेच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याचा उद्योग चालविला असल्याचा आरोप कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केला. शेतकऱ्यांच्या घरी जायला वेळ नसलेल्या भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांना माधुरी महत्त्वाची असल्याचेही ते म्हणाले.चव्हाण म्हणाले की, कोरेगाव-भीमा प्रकरणात सध्या एल्गार परिषदेच्या आयोजकांवर पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. यात कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचा दावा करण्यात येत असला तरी, त्याचे पुरावे भाजपने द्यावेत. कॉँग्रेसचा कोणताही संबंध नसतानाही यात कॉँग्रेस कार्यकर्ते असल्याचा निष्कर्ष भाजपाकडून काढला जात आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या भिडे व एकबोटेंवर कारवाई करण्यापेक्षा त्यांच्यावरील लक्ष विचलित करण्यासाठीच भाजपाने हा उद्योग चालविला आहे.भाजपा - शिवसेनेच्या बैठकीबाबत ते म्हणाले की, एकमेकांवर दबाव निर्माण करायचा आणि हेतू साध्य करायचा, हा दोन्ही पक्षांचा डाव असून, केवळ सौदेबाजीसाठी भाजप व सेना एकत्र आले आहेत. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेली बैठक ही सौदेबाजीसाठीच होती. शेतकºयांच्या घरी जायला वेळ नसलेल्या अमित शहा यांना अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या घरी जायला वेळ मिळतो. शहा भलेही माधुरीचे ‘फॅन’ असतील, पण शेतकºयांसाठीही त्यांनी वेळ द्यायला हवा, अशी टीकाही शेवटी चव्हाण यांनी केली. यावेळी आ. विश्वजित कदम, कॉँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील उपस्थित होते.कॉँग्रेसची समन्वय समितीआगामी पालिका निवडणुकीत ताकदीने उतरून विजय संपादन करण्यासाठी कॉँग्रेसतर्फे समन्वय समितीची स्थापना करण्यात आली असून, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे समितीची सूत्रे असणार आहेत. माजी मंत्री सतेज पाटील, प्रकाश सातपुते, अभय छाजेड हे त्यात सदस्य असतील
भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांना माधुरी महत्त्वाची! - अशोक चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2018 6:23 AM