सांगली : सांगली जिल्हा बँकेचे संचालक आमदार अनिल बाबर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर नवीन संचालकाची नियुक्तीसाठी गुरुवारी जिल्हा सहकार उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली संचालकांची बैठक झाली. या बैठकीत अमोल बाबर यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.अनिल बाबर यांचे जानेवारीत निधन झाले. ते खानापूर तालुका विकास सोसायटी गटातून जिल्हा बँकेचे संचालक झाले होते. रिक्त जागेवर नूतन संचालकांची निवडीसाठी जिल्हा बँकेने राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणकडे प्रस्ताव पाठवला होता. प्राधिकरणच्या मंजुरीनंतर नवीन संचालकाची निवड गुरुवारी झाली आहे. प्राधिकरणने जिल्हा उपनिबंधक (सहकार) मंगेश सुरवसे यांना निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्राधिकृत केले होते.गुरुवारी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. अर्ज भरण्याची मुदत संपेपर्यंत केवळ अमोल अनिल बाबर यांचा एकच अर्ज दाखल झाला. यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी अमोल बाबर यांची जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याचे जाहीर केले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक, उपाध्यक्षा जयश्री पाटील, यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.
सांगली जिल्हा बँकेच्या संचालकपदी अमोल बाबर यांची बिनविरोध निवड
By अशोक डोंबाळे | Published: June 27, 2024 2:25 PM