विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : औद्योगिक वसाहतींमधील घटलेले कारखाने, कामगारांची संख्या, नव्याने उद्योग निर्मितीचा अभाव, पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने बाहेरील उद्योजकांमध्ये सांगलीबद्दल असलेली नकारात्मकता अशा अनेक कारणांनी सांगलीतील औद्योगिक विकासासमोर मोठी लक्ष्मणरेषा तयार झाली आहे. त्यामुळे सांगलीतील युवा पिढी रोजगारासाठी पुणे, मुंबईत स्थिरावताना दिसत आहे.राजकीय उदासीनताही येथील औद्योगिक क्षेत्राच्या अधोगतीस तितकीच कारणीभूत आहे. केंद्र शासनाने कौशल्य विकास योजनेअंतर्गत जिल्ह्यात प्रयत्न चालू केले असले तरी, प्रशिक्षित मुलांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा, अशी बाजारपेठ विकसित झालेली नाही. सांगली जिल्ह्यातील १९६० पासूनची आकडेवारी पाहिली, तर कारखाने आणि त्यातील कामगारांची संख्या ही काही काळ वाढल्यानंतर गेल्या दहा वर्षांत त्यात घट झाल्याचे दिसत आहे.जिल्ह्यात सध्या ९ औद्योगिक वसाहती, संस्था असून, २0११-१२ या आर्थिक वर्षात ८0 कोटींचे एकूण १ हजार १९२ प्रकल्प कार्यान्वित होते. गेल्या पंधरा वर्षांत सांगली जिल्ह्यात एकही नवा मोठा उद्योग आला नाही. रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर होईल, अशा पद्धतीचे उद्योग आणण्याचा प्रयत्नही झालेला नाही. सांगली जिल्ह्यातून शिक्षण घेऊन बाहेर पडणारी हजारो मुले आज पुणे, मुंबई व अन्य राज्यातील मोठ्या शहरांकडे रोजगारासाठी धावत आहेत. सांगलीच्या औद्योगिक क्षेत्रातील रस्ते, पायाभूत सुविधा आजही मागासलेल्या आहेत. व्यापारी पेठांमधील परिस्थितीसुद्धा फार वेगळी नाही. त्यामुळे व्यापार, उद्योगाची प्रगती होण्याऐवजी अधोगती दिसत आहे. ही परिस्थिती कधी बदलणार, असा सवाल आता उपस्थित होत आहे.आतापर्यंत काय झाले उपाय?1सांगली जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये असलेल्या उद्योजकांनीच प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत रोजगार उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला.2महापालिकेच्या निर्मितीनंतर जकात अस्तित्वात असेपर्यंत येथील उद्योजकांना चालना देण्यासाठी ५0 टक्के करसवलत देण्यात आली.3सांगलीत नव्याने उद्योग यावेत, गुंतवणूक व्हावी म्हणून याठिकाणी प्रदर्शन व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जागा, कामगारांची उपलब्धता याबद्दल आकर्षण निर्माण व्हावे, यासाठी प्रयत्न झाले.तज्ज्ञांना काय अपेक्षित आहे?1कौशल्य विकास योजना राबविताना स्थानिक परिस्थिती व गरजांचा विचार होणे आवश्यक2राज्य महामार्गाला जोडणारे रस्ते, विमानसेवा यांचा विकास करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने मदत करायला हवी.3निर्यातक्षम कृषी मालासाठी आवश्यक सुविधा देताना या मालाच्या उपपदार्थ निर्मितीचे शिक्षण, उद्योगासाठी चालना, आर्थिक साहाय्य यांची उपलब्धता जिल्ह्यात होण्यासाठी राजकीय स्तरावर प्रयत्न आवश्यक.
बाहेरून येणाऱ्या उद्योजकांमध्ये सांगलीबद्दल नकारात्मकताच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2019 11:32 PM