लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कचरा डेपोवरील टाकाऊ वस्तूमधून महापालिकेने आमराई उद्यानात सुशोभिकरणाचे काम हाती घेतले आहे. वाहनांचे टायर, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, लाकूड, फरशीचे तुकडे अशा विविध वस्तूंमधून उद्यानातील कोपऱ्यात कलात्मक गोष्टींची निर्मिती सुरू आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या संकल्पनेतून आमराईत हा आर्टिस्टिक काॅर्नर आकाराला येत आहे.
स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानातर्गंत महापालिकेने टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ गोष्टी तयार करण्यावर भर दिला आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांनी टाकाऊ वस्तूंतून उद्यानाच्या सुशोभिकरणाची संकल्पना मांडली. त्याला आरोग्य व उद्यान विभागानेही सकारात्मक प्रतिसाद दिला. आरोग्य विभागाने कचरा डेपोवरील टाकाऊ वस्तू जमा केल्या. पावसाळ्यात जप्त केलेल्या वाहनांचे टायर उपलब्ध करून दिले. पाण्याच्या रिकाम्या बाटल्या जमा करण्यात आल्या. रस्त्यावर पडलेले बांधकाम साहित्यातून फरशीचे तुकडे गोळा करण्यात आले. याशिवाय लोखंडी भंगारही उपलब्ध झाले. त्यातून आता आमराईतील एका कोपऱ्यात सुशोभिकरणाचे काम सुरू झाले आहे. आर्किटेक्ट महाविद्यालयाच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींची मदतही घेण्यात येत आहे. शिवाय, आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांचेही मार्गदर्शन मिळत आहे.
या साऱ्यातून आता आमराईतील एक कोपरा कलात्मकरिता सजू लागला आहे. लहान मुलांना डोळ्यासमोर ठेवून सुशोभिकरण सुरू आहे. जुन्या टायरीचे कंपाऊंड घातले आहे. वेगवेगळ्या रंगांनी हे कंपाऊड सजले आहे. फरशीचे तुकडे व लाल माती टाकून वाॅकिंग ट्रक तयार केला आहे. लाकड्यातून कलात्मक गोष्टीही साकारल्या आहेत. उद्यानात येणाऱ्या नागरिक, लहान मुले, महिलांना बसण्यासाठी लाकडाचे स्टूल तयार केले आहे. मोकळ्या जागेत लाॅन तयार केला जाणार आहे. तसेच विद्युत रोषणाईचे काम हाती घेतले आहे. येत्या ३१ जानेवारीपर्यंत ही सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. या उद्यान सुशोभिकरणासाठी आरोग्याधिकारी डाॅ. रवींद्र ताटे, उद्यान अधीक्षक शिवप्रसाद कोरे यांच्यासह स्वच्छता निरीक्षक, सफाई कामगार परिश्रम घेत आहेत.
चौकट
सेल्फी पाईंट, झोपाळा ते बाटल्याची भिंत
उद्यानात सेल्फी पाँईटही तयार करण्यात आला आहे. लहान मुलांसाठी झोपळाही बांधला आहे. टायरीच्या माध्यमातून सायकल, मोटारीची रचना करण्यात आली आहे. पाण्याच्या बाटलीपासून आता झोपडी, वाॅल उभारली जाणार आहे. टायरी एकमेकांवर रचून मनोरे तयार केले जात आहेत. लोखंडी भंगारातून तोफ, प्रवेशद्वार सजविले जाणार आहे. याशिवाय काही प्राणीचे पुतळेही बसविण्यात येणार आहेत.