सांगली :
बँक अकाऊंट बंद होणार असल्याचे सांगून मोबाईलवर पाठविलेल्या लिंकच्या माध्यमातून सांगलीतील एकाला २ लाख ८७ हजार रुपयांना गंडा घालण्यात आला होता. सायबर पोलिसांच्या सतर्कतेमुळे बँक अकाऊंटवरून गेलेली ही रक्कम परत मिळविण्यात यश आले.
याबाबत माहिती अशी की, विश्रामबाग येथील विनय रघुनाथ शिंदे यांना ८ जानेवारी रोजी त्यांचे बँक अकाऊंट बंद होणार असल्याचा मॅसेज आला. त्या मॅसेजसोबत एक लिंकही होती. लिंक उघडून शिंदे यांनी त्यात माहिती भरली. तसे त्यांच्या अकाऊंटवरील दोन लाख ८७ हजार ८९१ रुपये काढल्याचा मॅसेज आला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शिंदे यांनी तातडीने सायबर पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली.
पोलिस अधीक्षक डाॅ. बसवराज तेली, अप्पर अधीक्षक आंचल दलाल यांनी सायबर पोलिसांना तातडीने तपासाच्या सूचना केल्या. सायबरचे निरीक्षक सतीश शिंदे, उपनिरीक्षक रोहिदास पवार, हेड काॅन्स्टेबल महादेव घेरडे, योगिता लोखंडे यांनी तांत्रिक विश्लेषण करून फसवणुकीच्या व्यवहाराबाबत स्टेट बँकेशी पत्रव्यवहार केला. फसवणुकीच्या रकमेवरून फ्लिपकार्टवर वस्तू खरेदी केल्याचे समजले. तात्काळ फ्लिपकार्टचे नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या रकमेतून खरेदी केलेल्या वस्तू थांबविण्याची सूचना केली. नोडल अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करीत वस्तू थांबवून २ लाख ६२ हजार ८९१ रुपये बँक अकाऊंटवर परत पाठविले. पोलिसांनी वेळीच हालचाल केल्याने पावणेतीन लाखांची फसवणूक टळली.