सांगली: संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. कृष्णा नदीची पातळी १८ फुटावर गेली आहे. शहरातील सूर्यवंशी प्लाॅट, मगरमच्छ काॅलनी परिसरातील नागरिकांना खबरदारीच्या सूचना दिल्या जात आहेत. पाणी पातळी वाढल्यास या परिसरातील नागरिकांना बाडबिस्तारा आवरून सुरक्षित स्थळी स्थलांतर होण्याचे आवाहन केले जात. त्यामुळे पूरपट्ट्यात पुराची भीती निर्माण झाली आहे.२०१९ मध्ये सांगली शहराला महापूराचा तडाखा बसला. पुराचा अंदाज न आल्याने लाखो लोक घरात अडकून पडले. त्यानंतर २०२१ मध्ये पुन्हा महापुराने रौद्ररुप धारण केले. यावेळी सव्वा लाखहून अधिक लोकांचे स्थलांतर झाले होते. आता कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढू लागली आहे. मंगळवारी सकाळी १८ फुटापर्यंत नदीपात्रात पाणी होते. कृष्णा नदीची पातळी आयर्विन पुलाजवळ ३२ फुट झाल्यानंतर सूर्यवंशी प्लाॅटमध्ये पाणी शिरते. तर ३५ फुटाला कर्नाळ रस्ता पाण्याखाली जातो. दरम्यान महापूराचा अनुभव लक्षात घेता महापालिकेने महिन्यापूर्वीच पुरपट्ट्यातील नागरिकांना नोटीसा बजाविल्या आहेत.सध्या कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता महापालिका प्रशासनाने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. मंगळवारी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आयुक्त सुनील पवार, उपायुक्त राहूल रोकडे, सहायक आयुक्त सहदेव कावडे, अग्निशमन अधिकारी सुनील माळी, स्वच्छता निरीक्षक युनूस बारगीर, प्रणिल माने, धनंजय कांबळे आदिंनी सूर्यवंशी प्लाॅटमधील नागरिकांशी संवाद साधला. पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता गृहीत धरून नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे, याची मानसिकता तयार करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे.
पावसाचा जोर, कोयना धरणातील विसर्ग यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या नागरी वस्तीत पाणी येण्यासारखी परिस्थिती नाही. मात्र पावसाचा जोर वाढला तर पाणी पातळी वाढू शकते. खबरदारी म्हणून नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे तसेच साहित्य वेळीच हलवावे, असे आवाहन केले आहे. नागरिकांनी सध्या घाबरण्याचे कारण नाही मात्र जागृत राहावे. - सुनील पवार, आयुक्त