सांगली : कडेगाव, सांगोलासह अथणी (कर्नाटक) येथून महागड्या दुचाकी लंपास करणाऱ्या दोघांना पोलिसांनी जेरबंद केले. यातील एक अल्पवयीन असून, शुभम प्रकाश पवार (वय २८, रा. रांजणी ता. कवठेमहांकाळ) असे दुसऱ्या संशयिताचे नाव आहे. त्यांच्याकडून सहा लाख ४० हजार रुपये किंमतीच्या आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात वाढलेल्या जबरी चोरीच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने विशेष पथक तयार केले आहे. हे पथकाला माहिती मिळाली की, संशयित शुभम पवार व त्याचा मित्र हे बिना नंबरप्लेट असलेल्या दुचाकीवरून रांजणी गावातून फाट्याच्या दिशेने येत आहेत. त्यानुसार पथकाने निगराणी केली असता, दोघे दुचाकीवरून तिथे आले. त्यांना पळून जाण्याची संधी न देता दोघांना पोलिसांनी जेरबंद केले.
त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत अल्पवयीन मुलगा व दत्ता नरळे (रा. एमएसइबी कार्यालयामागे, कवठेमहांकाळ) यांनी कडेगाव येथून चोरी केल्याची कबुली दिली. अधिक चौकशीत तिघांनी चार बुलेट, ३ हिरोहोंडा दुचाकी तर एक यामाहा दुचाकी कडेगाव, सांगोला (जि. साेलापूर) आणि अथणी (कर्नाटक) येथून चोरी केल्याची कबुली दिली. या चोरीबाबत त्या त्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे खात्री करण्यात आली.