आटपाडी : आटपाडी तालुक्याचे भाग्यविधाते श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त एक लाख पुस्तके वाचण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. आटपाडी वाचन कट्टा व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा आटपाडी यांच्या वतीने आयोजन केले आहे, अशी माहिती वाचन कट्टा ग्रुपचे दिनेश देशमुख यांनी दिली.
वाचन कट्टा ग्रुप २००४ पासून आटपाडीत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त साहित्यिक उपक्रम घेत आहेत. या माध्यमातून साहित्यिक रामदास फुटाणे, आप्पासो खोत, कवी सुरेश शिंदे, विसुभाऊ बापट, प्रशांत मोरे यांच्यापासून माणदेशी साहित्यिक सुभाष कवडे, सुधीर इनामदार, कथाकथनकार जयंवत आवटे, बाबा परीट, हिम्मत पाटील, संभाजीराव गायकवाड यांच्या कार्यक्रमाचा आस्वाद आटपाडीकरांनी घेतला आहे.
या काळात अनेक साहित्यिकांनी आपण वाचन केले पाहिजे, वाचन संस्कृती कमी होत आहे, अशी खंत व्यक्त केली होती. अमरसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वाचन चळवळ टिकली पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू असून, आतापर्यंत हजारो विद्यार्थी व वाचकांनी पुस्तके वाचून त्याचे आकलन केले आहे.
श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. दि. १० मार्च, २०२२ ते १० मार्च, २०२३ या वर्षात एक लाख पुस्तकांचे वाचन करण्याची तयारी करण्यात आली आहे. फक्त आटपाडी तालुक्यातील वाचक नव्हे, तर जगभरातील वाचकांनी सहभागी व्हावी, असे आवाहन दिनेश देशमुख यांनी केले आहे.