सांगली : वेळ सकाळी अकराची... पोलीस नियंत्रण कक्षातील दूरध्वनी खणखणला... येथील शंभरफुटी रस्त्यावरील ‘डी मार्ट’मध्ये अतिरेकी घुसल्याची माहिती मिळाली आणि पोलिसांचा फौजफाटा शंभर फुटी रस्त्याकडे धावला. दोनशेहून अधिक कर्मचारी, वरिष्ठ अधिकारी, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, जलद कृती दलाची तुकडी असा लवाजमा ‘डी मार्ट’समोर आला. पोलिसांची ही फौज आतमध्ये शिरली. पाच अतिरेक्यांपैकी चार जणांना गोळ्या घालून ठार करण्यात आले, तर एकाला जिवंत पकडले. सुमारे अर्धा तास पोलिसांची ही कारवाई सुरू होती. नागरिकांना नेमके काय घडते आहे हेच समजेनासे झाले. अखेर हे पोलिसांचे प्रात्यक्षिक सुरू असल्याचे कळाल्यावर नागरिकांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बुधवारी शंभरफुटी रस्त्यावर दहशतविरोधी कारवाईचे प्रात्यक्षिक केले. एखादा अनुचित प्रकार घडला, तर पोलिसांचा ताफा किती वेळेत येऊ शकतो, याची चाचणी घेण्यात आली. यातून पोलिसांची दक्षता तपासण्यात आली. जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांनी शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना दक्षतेचे आदेश दिले आहेत. संवेदनशील भागात कोम्बिंग आॅपरेशन व दंगलविरोधी प्रात्यक्षिक घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार बुधवारी सकाळी अकरा वाजता पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या उपस्थितीत प्रात्यक्षिक घेतले. शंभरफुटी रस्त्यावरील ‘डी मार्ट’मध्ये अतिरेकी घुसल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली. नियंत्रण कक्षाकडून सांगली शहर, विश्रामबाग, संजयनगर व सांगली ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक धनाजी आवटे, प्रदीपकुमार जाधव, अनिल चोरमले, रवींद्र डोंगरे यांचा ताफा तातडीने दाखल झाला. या कारवाईत रुग्णवाहिका व अग्निशमन विभागही सहभागी झाला होता. ‘डी मार्ट’मध्ये पोलीस शिरले. तेथे चार अतिरेक्यांवर पोलिसांनी नकली गोळीबार केला, तर एकाला जिवंत पकडले. सायरन वाजवत भरधाव वेगाने पोलिसांचा ताफा जाऊ लागल्याने, शहरात काय घडले आहे, याची चर्चा सुरू झाली होती. नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पण हे प्रात्यक्षिक असल्याचे समजताच नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. याची चर्चा मात्र दिवसभर रंगली होती. (प्रतिनिधी)नागरिकांमध्ये घबराट‘डी मार्ट’मध्ये पोलीस शिरले, त्यावेळी उपस्थित नागरिकांमध्ये एकच घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. तेथे चार अतिरेक्यांवर पोलिसांनी नकली गोळीबार केला, तर एकाला जिवंत पकडले. सायरन वाजवत भरधाव वेगाने पोलिसांचा ताफा जाऊ लागल्याने, शहरात काय घडले आहे, याची चर्चा सुरू झाली होती. नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. काही वेळानंतर पोलिसांनीच कोणताही अनुचित प्रकार घडलेला नसून हे प्रात्यक्षिक असल्याचे सांगितले.
...अन् डी मार्टमध्ये जिवंत अतिरेकी पकडला!
By admin | Published: October 28, 2015 11:12 PM