प्रताप महाडिक -
तोंडोली (ता. कडेगाव, जि. सांगली) : येथील अश्विनी खलिपे यांच्यावर दिल्ली येथील सर गंगाराम रुग्णालयात टप्प्याटप्प्याने झालेल्या तीन लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. डॉ. भीमसिंग नंदा यांनी या शस्त्रक्रिया केल्या आहेत. यामुळे आता अश्विनीला अंश खलिपे अशी ओळख मिळाली आहे.
दोन वर्षांपूर्वी अश्विनी खलिपे या २८ वर्षीय तरुणीने लिंग परिवर्तन करण्याचा मानस बाळगला आणि पहिल्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर गॅझेट करून अंश खलिपे हे नाव धारण केले. पहिल्या टप्प्यातील शस्त्रक्रिया १६ मार्च २०२२ रोजी झाली. नंतर चार महिन्यांनी दुसऱ्या टप्प्यातील शस्त्रक्रियाही यशस्वी झाली. त्यानंतर आता नुकतीच तिसरी शस्त्रक्रियाही यशस्वी झाली आहे.
लहानपणापासूनच पुरुषाप्रमाणे कृती अश्विनीच्या शारीरिक जडणघडणीतून दिसून येत होत्या. करारीपणा, निडरपणा, पोशाख या सर्व बाबतीत पुरुषाप्रमाणे वर्तन होते. लिंग परिवर्तनाच्या या धाडसी निर्णयाला त्यांच्या कुटुंबीयांनी पाठिंबा दिला आणि परिवर्तनाची नवी दिशा समाजाला दिली आहे.
अंश उच्चशिक्षित - अंश खलिपे यांनी सांगलीतून एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले आहे. याशिवाय टिळक विद्यापीठाच्या सांगली शाखेत पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. - आता भारती विद्यापीठाच्या पुणे येथील लॉ कॉलेजमध्ये एलएलएमचे शिक्षण सुरू आहे.