रमेश वारके ।बोरवडे : आर.टी.ई.कायद्यानुसार सहा ते चौदा वयोगटांतील एकही मूल शाळाबाह्य राहू नये , शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शासन वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. याअंतर्गत कागल तालुक्यात एका मुलीला शालेय प्रवाहात आणण्यात आले.
नांदेड येथील ज्ञानेश्वर देवकांबळे आपल्या कुटुंबासह सात वर्षांपूर्वी कागल तालुक्यातील हसूर खुर्द येथे उदरनिर्वाह करण्यासाठी आले. त्यांना दोन मुली व मुलगा आहे. आपल्या शेजारील मुले शाळेत जात आहेत हे पाहून मोठी मुलगी नंदिनीला शाळेत जावी असे वाटले पण दाखला नाही की कागदपत्रे नाहीत. त्यांनी आपले दु:ख ग्रामपंचायत शिपाई विलास कांबळे यांना बोलून दाखविले. मुख्याध्यापक बाबासाहेब कांबळे यांची त्यांनी भेट घेतली.बालरक्षक सदानंद पाटील , मारुती जाधव , वनिता साबणे यांच्या सहकार्याने शिक्षकांनी पालकांना दिलासा दिला. तिचे प्रतिज्ञाप्रज्ञ लिहून घेऊन रितसर दाखला कार्यवाहीसाठी प्रयत्न करू असे सांगितले आणि नंदिनीला शाळेत हजर केले. नंदिनीचा व तिच्या वडिलांचा हसरा चेहरा पाहून सर्वांचे डोळे आनंदाने भरुन आले.२९० मुले शालेय प्रवाहातप्रत्येक तालुक्यातील काही शिक्षकांना राज्यस्तरीय प्रशिक्षण देऊन त्यांना बालरक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. सदानंद पाटील, मारुती जाधव, वनिता साबणे यांची तालुक्यात बालरक्षक म्हणून टीम कार्यरत आहे. गटशिक्षणाधिकारी गणपती कमळकर, मुख्याध्यापक, शिक्षक, तसेच चौंडाळ शाळेचे शिक्षक एस. के. पाटील, सुजाता माळवदे यांच्या सहकार्याने बालरक्षक टीमने २९० शाळाबाह्य मुलांना शालेय प्रवाहात आणले आहे.