सांगली : ती अवघ्या सात वर्षाची. इंग्रजी शाळेत शिकणारी. खेळायचे-बागडायचे तिचे हे दिवस. पण या वयातच तिच्यावर हृदयशस्त्रक्रिया करावी लागली. डॉक्टरांनी घरीच विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. घरी आल्यानंतर तिला शाळेची, वर्गमैत्रिणींची, शिक्षकांची आठवण होऊ लागली... अन् तिच्या या आनंदासाठी अखेर शिक्षक, संस्थाचालक, वर्गमित्र-मैत्रिणी घरी येऊन धडकल्या. जणू तिच्या घरातच शाळा भरली. तब्बल तीन तास गप्पा, गोष्टी, गाणी गाऊन त्यांनी तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले.
महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश प्रायमरी स्कूलने राबविलेल्या या अनोखा उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. सांगली शहरातील सरस्वतीनगर येथे राहणारे विजय क्षीरसागर यांची सातवर्षीय कन्या श्रीनिधी हिच्या हृदयात बिघाड असल्याचे निदान काही दिवसांपूर्वी झाले. श्रीनिधीच्या आजाराची माहिती होताच क्षीरसागर दाम्पत्य घाबरले. तिच्या पालकांनी शाळेच्या शिक्षक आणि शिक्षिकांना आजाराबाबत माहिती दिली. शाळेने या कुटुंबियांना धीर दिला. मिरजेतील रुग्णालयात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रविकांत पाटील यांनी श्रीनिधीवर यशस्वी शस्त्रक्रिया केली. डॉक्टरांनी सात दिवस तिला विश्रांती घेण्याचा सल्लाही दिला.
शाळेच्या व्यवस्थापिका स्मिता जोशी सांगतात की, श्रीनिधीच्या हृदयाला छिद्र असल्याचे कळल्यानंतर पालक घाबरले होते. तीही शाळेत उशिरा येऊ लागली. तिच्या आजाराची कल्पना आल्यानंतर व्यवस्थापनानेही तिला सवलत दिली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर श्रीनिधी शाळेत जाण्याचा आग्रह करू लागली. इकडे तिच्या वर्गमैत्रिणीही, ती का शाळेत येत नाही, अशी विचारणा करीत होत्या. अखेर संस्थेचे सचिव प्रा. श्रीराम कानिटकर यांच्याशी आम्ही चर्चा केली. त्यांनीही या अनोख्या उपक्रमाला पाठिंबा दिला आणि तिच्या घरीच एक दिवस शाळा भरविण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयाला पालक प्रतिनिधी गिरीश रजपूत, अविनाश शेटे यांचेही पाठबळ मिळाले. गेल्या सोमवारी श्रीनिधीच्या वर्गातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षिका स्मिता शेटे, रूपाली कदम यांच्यासह व्यवस्थापक स्मिता जोशी याही तिच्या घरी दाखल झाल्या. तिच्या वर्गमैत्रिणी, मित्रांनी तिला गुलाबपुष्प, शुभेच्छा पत्र दिले. त्यानंतर तब्बल तीन तास घरातच शाळा भरली. गाणी, गोष्टीतून वर्गातील वातावरण तयार झाले आणि श्रीनिधीच्या चेहऱ्यावरही हास्य फुलले. श्रीनिधीचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून एमटीई सोसायटीने राबविलेल्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
श्रीनिधीच्या आजाराबाबत कळल्यानंतर तिचे पालकही घाबरले होते. पण सर्वांनीच त्यांना धीर दिला. तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. तिचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, आजाराविषयीची भीती नाहीशी व्हावी, या उद्देशाने आम्ही तिच्या घरीच शाळा भरविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तिच्या पालकांना विश्वासात घेतले. तिला आनंद देण्याचा आमचा प्रयत्न होता.- स्मिता जोशी, व्यवस्थापिका, इंग्लिश प्रायमरी स्कूलमहाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी सामाजिकतेचे भानही राखून आहे. श्रीनिधीबाबत कळले, तेव्हा तिच्या पालकांना धीर देण्याचा निर्णय संस्थेने घेतला. तिच्या घरी शाळा भरविण्याचा निर्णय शिक्षकांनी सांगताच त्याला तातडीने मान्यता दिली. तिच्या चेहºयावर हास्य फुलविण्यात संस्था यशस्वी ठरल्याचा अभिमान आहे.- श्रीराम कानिटकर, सचिव, एमटीई सोसायटी.श्रीनिधीच्या आजाराची माहिती सर्वच पालकांना मिळाली. त्यानंतर सर्वच पालकांनी तिच्या कुटुंबियांना दिलासा दिला. तिच्या घरी एक दिवस शाळा भरविण्याच्या निर्णयाला सर्वांनी पाठिंबा दिला. शाळेनेही स्कूल व्हॅन उपलब्ध करून मुलांना तिच्या घरापर्यंत नेले. तिच्या चेहºयावरील आनंद आम्हाला समाधान देऊन गेला.- गिरीश रजपूत, पालक प्रतिनिधी