इस्लामपूर : महारयत, रयत अशा कंपन्यांच्या माध्यमातून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्तकांनीच शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. कडकनाथ कुक्कुटपालन प्रकरणाची ‘ईडी’मार्फत चौकशी करावी. याच्याशी खोत यांचा संबंध नसेल, तर त्यांनीच फसवणूक करणाऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात द्यावे. १२ सप्टेंबरपर्यंत शेतकºयांचे पैसे न मिळाल्यास किंवा संशयितांना अटक न झाल्यास १३ सप्टेंबरला खोत यांच्या घरावर अंडीफेक करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चा, प्रहार जनशक्ती आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शुक्रवारी दिला.कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसायातून फसवणूक झालेल्या राज्यभरातील शेतकºयांना बरोबर घेऊन प्रहार जनशक्ती, मराठा क्रांती मोर्चा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पोलीस ठाण्यावर आसूड मोर्चा काढला. या मोर्चात गुंतवणूकदारांचा आणि महिलांचा लक्षणीय सहभाग होता. येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात सर्वजण एकत्र जमले.तेथे मराठा क्रांती मोर्चाचे दिग्विजय पाटील म्हणाले की, महारयत, रयत कंपन्यांचे संचालक सुधीर आणि संदीप मोहिते बंधूंच्या मागे दुसरे कोणी नसून सदाभाऊ खोत हेच आहेत. त्यांची चौकशी केली, तर जमिनी आणि भूखंड बाहेर निघतील. पोलिसांनी या फसवणुकीची गांभीर्याने दखल घेऊन प्रत्येक शेतकºयाचे वैयक्तिक गुन्हे नोंद करावेत. पोलीस प्रशासनाला मंत्र्यांची चाटूगिरी करू देणार नाही.प्रहार जनशक्तीचे स्वप्नील पाटील म्हणाले की, शेतकºयांच्या जिवावर मंत्री झालेल्यांनी या घटनेशी संबंध नसेल, तर सुधीर आणि संदीप मोहिते कोण आहेत हे जाहीरपणे सांगावे. पुणे येथील कार्यालयाच्या उद्घाटनाला त्यांचा मुलगा सागर खोत कसा आला होता, हेही त्यांनी जाहीर करावे. फसवणूक झालेल्या शेतकºयांचे गुन्हे पोलिसांनी नोंद करावेत.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष भागवत जाधव म्हणाले की, या कंपनीच्या संचालकांनी पारधी समाजाचीही फसवणूक केली आहे. शेतकºयांची आणि पारधी समाजाची फसवणूक करणाºया संचालकांच्या मुसक्या पोलिसांनी आवळाव्यात.कोल्हापूर जिल्ह्यातील सांगरूळ येथील मारुती खाडे म्हणाले की, शेतकºयांनी पै पै साठवून या व्यवसायात गुंतवणूक केली. पैसे घेताना सुधीर मोहिते, संदीप मोहिते यांच्याबरोबरीने मंत्र्यांचा मुलगाही हजर होता. त्यामुळे याच्याशी आपला संबंध नाही, असे मंत्री कसे म्हणतात?रेश्मा पवार म्हणाल्या की, आमच्या पैशावर डल्ला मारणाºया सुधीर मोहितेला मोक्का लावा.निर्मला पवार म्हणाल्या की, पती निधनानंतर मुलांसाठी काही तरी करूया म्हणून कर्ज काढून हा व्यवसाय केला. पैसे गुंतवले. पण त्यातही तोटा झाला.उस्मानाबाद जिल्ह्यातील एक शेतकरी म्हणाला की, नऊ लाख रुपयांचे कर्ज काढून या कडकनाथ कोंबडी पालनात गुंतवले. हे पैसे मंत्र्यांनी परत करावेत. या फसवणूक करणाºयांविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याशिवाय हलणार नाही.दरम्यान, पोलीस ठाण्यासमोर मोर्चा आल्यानंतर पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांना शेतकºयांच्यावतीने गुन्हे दाखल करण्याच्या मागणीचे अर्ज दिले.खाती, मालमत्ता सील करणारपोलीस निरीक्षक नारायण देशमुख म्हणाले की, जिल्हा पोलीसप्रमुख सुहैल शर्मा यांनी आर्थिक गुन्हे शाखेला तपासाचे निर्देश दिले आहेत. पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाºयांकडून हा तपास होईल. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने फसवणूक करणाºया कंपनी संचालकांच्या विविध वित्तीय संस्थांमधील खाती सील करून त्यांची चौकशी करणे, त्यांच्या मालमत्ता शोधून सील करणे यावर आधी भर दिला जाईल. त्यांना कार्यक्षेत्र सोडून बाहेर जाता येणार नाही, यासाठी पूर्ण चौकशी झाल्यानंतर रितसर कारवाई केली जाईल.
सदाभाऊंच्या घरावर अंडीफेक आंदोलन करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 11:51 PM