लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यातील सुमारे तीन हजार अंगणवाडी सेविकांनी मोबाईल शासनाला परत केले आहेत. त्यामुळे त्यांचा नियमित संपर्क तुटला असून, सध्या ऑफलाईन कामकाज सुरू आहे.
मोबाईलच्या तक्रारींचा पाढा शासनाकडे वारंवार वाचल्यानंतरही अधिकाऱ्यांनी काणाडोळा केला, त्यामुळे अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या. तक्रारींवर कार्यवाही केली नाही तर मोबाईल वापसी आंदोलन करू, असा इशाराही दिला होता, तोदेखील प्रशासनाने नजरेआड केला. आता सेविकांनी थेट मोबाईल परत जमा केल्यानंतर मात्र तारांबळ उडाली आहे. मोबाईल परत न्यावेत आणि आंदोलन मागे घ्यावे यासाठी सेविकांवर दबाव टाकला जात आहे.
बॉक्स
आता महिन्यातून एकदाच अहवाल
आतापर्यंत ऑनलाईन कामकाजामुळे रोजच्या रोज कामाचा अहवाल कळवला जात होता. पोषण आहार व इतर आरोग्यविषयक उपक्रमांची माहिती दिली जात होती. आता मोबाईल परत केल्याने ऑफलाईन कामकाज सुरू आहे. महिन्यातून एकदा सेविकांची आढावा बैठक होते, त्याचवेळी अहवाल दिला जाईल.
कोट
शासनाने दिलेल्या मोबाईलचा दर्जा अत्यंत खराब आहे. तो वारंवार नादुरुस्त होतो. त्याच्या दुरुस्तीसाठी अधिकृत सेवाकेंद्रातच न्यावे लागते. त्याचा खर्च तीन-चार हजार रुपये होतो. इतका खर्च करणे सेविकांना शक्य नाही. शासनाने खर्च द्यायला हवा.
- नादीरा नदाफ, अंगणवाडी सेविका
पोषण आहाराची माहिती भरण्यासाठी इंग्रजी भाषेतील ॲप दिले आहे. सेविकांनी ती समजणारी नाही. अन्य राज्यांत त्यांच्या स्थानिक भाषेतील ॲप दिली आहेत, तशीच मराठी भाषेतील ॲप महाराष्ट्र शासनाने द्यायला हवीत.
रेखा पाटील, अंगणवाडी कर्मचारी कृती समिती
पॉईंटर्स
जिल्ह्यातील एकूण अंगणवाड्या २९५०
अंगणवाडी सेविका २९५०
मोबाईल परत केलेल्या सेविका २९००
बॉक्स
भंगार मोबाईल, अनाकलनीय ॲप
- शासनाने दिलेले मोबाईल भंगार दर्जाचे असल्याची अंगणवाडी सेविकांची तक्रार आहे.
- त्याच्या दुरुस्तीसाठी किमान तीन-चार हजार रुपयांचा खर्च सेविकांच्या आवाक्याबाहेरचा आहे.
- पोषण आहाराची माहिती इंग्रजीत भरण्याची सक्ती आहे, पण सेविकांनी मराठी ॲपची मागणी केली आहे.