संतोष भिसे, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : निवृत्तीवेतनासाठी १६ राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी ४ ऑक्टोबररोजी दिल्लीत मोर्चाचा निर्णय घेतला आहे. सांगलीत रविवारी कर्मचाऱ्यांचा मानधन वाढीचा आनंद मेळावा व पेन्शनसाठी निर्धार मेळावा झाला. अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष एम. ए. पाटील अध्यक्षस्थानी होते.
मेळाव्यासाठी जिल्हाभरातून अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. जिल्हाध्यक्षा आनंदी भोसले यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष पाटील म्हणाले, राज्य सरकारने मानधनवाढ केल्याबद्दल आभार मानतो, पण अन्य अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सेविकांना नवे मोबाईल रिचार्जसह मिळावेत या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. सेविकांना निवृत्तीवेतनासाठी सातत्याने संघर्ष सुरु आहे. सध्या काही रक्कम देऊन बोळवण केली जाते, पण त्यातून सेविकांच्या वृद्धत्वातील उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटत नाही. त्यामुळे निवृत्तीवेतनासाठी निर्णायक आंदोलन करणार आहोत. दिल्लीमध्ये १६ राज्यांतील सेविका ४ ऑक्टोबररोजी आंदोलनासाठी एकत्र येणार आहेत. तत्पूर्वी मुंबईतही आंदोलन केले जाणार आहे.
यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष निलेश दातखिळे, सचिव राजेश सिंग, शशिकांत सपकाळ, माधवी शिंदे यांनीही मार्गदर्शन केले. मेळाव्याला कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड, स्नेहलता कोरे, विजया जाधव, शुभांगी कांबळे, अलका माने, राणी जाधव, कविता शिंदे, नीलप्रभा लोंढे, रेखा साळुंखे, नादीरा नदाफ, मधुमती मोरे, काशीबाई पट्टणशेट्टी, सोनाली जगदाळे, अरुणा झगडे, अलका विभुते आदी उपस्थित होते.
संघटनेच्या मागण्या अशा :- बालकांच्या पोषण आहाराचे अनुदान ८ रुपयांवरुन १० रुपये करावे.- नवे मोबाईल रिचार्जसह मिळावेत.- सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, ग्रॅच्युइटी, सेवानिवृत्तीचे लाभ द्या.- मिनी अंगणवाड्यांना मोठ्या अंगणवाड्यांचा दर्जा द्या.