सांगली : बा विठ्ठला! आमच्या मागण्यांच्या पुर्ततेसाठी सरकारला बुद्धी दे!! अशी प्रार्थना करीत जिल्हाभरातील अंगणवाडी सेविकांनी मंगळवारी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या मारला. टाळ- मृदुंगाचा गजर करीत मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला.
प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आंदोलकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. सकाळी मुख्य बसस्थानकापासून मोर्चाला सुरूवात झाली. शासकीय रुग्णालय चौक, राम मंदिर चौकातून आंदोलक जिल्हा परिषदेकडे आले. शेकडो आंदोलक सेविकांनी तेथेच ठिय्या मारला. मोर्चाच्या नेत्यांनी यावेळी मागण्या मांडल्या. त्या मान्य झाल्याशिवाय मागे हटायचे नाही, असा निर्धार केला.मोर्चेकऱ्यांनी मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला दिले.त्यात म्हटले आहे की, अंगणवाडीत बालके, गर्भवती माता व स्तनदा मातांना अनेक प्रकारच्या शैक्षणिक व आरोग्यविषयक सेवा दिल्या जातात. लसीकरण, आरोग्य तपासणीसह अनेक कामे करावी लागतात. इतक्या कामांचा बोजा असतानाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाइन आणि ऑफलाइन फॉर्म भरण्याची सक्ती केली जात आहे. हे काम लादण्यात आले आहे. त्यामुळे अंगणवाडीची मूळ कामे करण्यास कर्मचाऱ्यांना वेळ मिळेना झाला आहे.
आंदोलकांनी यावेळी मानधनवाढ, निवृत्तीवेतन या मागण्यांचाही गजर केला. पावसाळी अधिवेशनात यावर कोणतीही चर्चा झाली नसल्याने संताप व्यक्त केला. संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड म्हणाले, सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे, तत्पूर्वी प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत.आंदोलनाचे नेतृत्व राज्य उपाध्यक्षा आनंदी भोसले, जिल्हाध्यक्षा अरुणा झगडे, सचिव नादीरा नदाफ, उपाध्यक्षा अलका विभुते, अलका माने, राणी जाधव, मधूमती मोरे आदींनी केले.
`विठ्ठल रखुमाई`ने वेधले लक्षदोघी अंगणवाडी सेविका मोर्चामध्ये विठ्ठल आणि रखुमाईच्या वेशभुषेत सहभागी झाल्या होत्या. कमरेवर दोन्ही हात ठेवून मोर्चात अग्रभागी चालत होत्या. त्यांनी शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.