सांगली : सेवानिवृत्त अंगणवाडी महिलांना ग्रॅज्युएटी, पेन्शन तत्काळ मिळावी, यासह विविध मागण्यांसाठी पूर्व प्राथमिक शिक्षिका सेविका संघ (आयटक संलग्न) यांच्या नेतृत्वाखाली सेविकांनी जिल्हा परिषदेवर मंगळवारी मोर्चा काढला. शासनाच्या विरोधात जोरदार घोषणा देऊन केंद्र आणि राज्य सरकारचा सेविकांनी निषेध केला. जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी विविध मागण्यांसाठी मोर्चा काढून जिल्हा परिषद प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले.
निवेदनामध्ये म्हटले की, सेवानिवृत्त महिलांना थकित एकरकमी व्याजासह पेन्शन मिळाली पाहिजे. नवीन मोबाइल मातृभाषेमधील ॲपसह वारंवार मागणी करूनही मिळत नाहीत. यामुळे शासकीय माहिती भरण्यात मोठ्या अडचणींना सेविकांना सामोरे जावे लागत आहे. सेविकांना दैनंदिन जादा कामाचे वार्षिक ३० हजार रुपयेप्रमाणे अतिरिक्त पैसे मिळाले पाहिजेत, तसेच अंगणवाडीमधील बालकांना आहार शिजविण्याची जबाबदारी बचत गटांना द्यावी, सेविका व मदतनिसांना कोरोनामधील सेवेचे २१ हजार रुपये मिळावेत, आदी मागण्यांचा समावेश आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष मंगल पाटील, तालुकाध्यक्ष कमल गुरव, राज्य संघटक विठ्ठल सुळे, संजय पाटील, दिगंबर इनामके आदींसह सेविका व मदतनीस आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
मानधन अडविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कराशिराळा तालुक्यातील सेविका व मदतनिसांचे मे २०१५ ते २०१७ या कालावधीतील थकीत मानधन अधिकाऱ्यांनी अडविले आहे. अधिकाऱ्यांनी मानधनाचे पैसे अडविल्यामुळे शिराळा तालुका पतसंस्थेचे दहा लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही अध्यक्षा मंगला पाटील यांनी केली आहे.