सांगली : फुलांची सुंदर आरास...विद्युत रोषणाईत उजळून गेलेले मंदिर, सुंदर रांगोळी, सुंगधी धुप, अगरबत्तीचा दरवळ अशा वातावरणात आज, मंगळवारी सांगलीच्या पंचायतन गणपती मंदिरात अंगारकी साजरी करण्यात आली. दर्शनासाठी मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी रांगा लावल्या होत्या. वर्षातील ही पहिलीच अंगारकी असल्याने व कोरोनाचे निर्बंधही हटल्याने भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती.पंचायतन ट्रस्टमार्फतही गेल्या दोन दिवसांपासून मंदिरात आरास व अन्य तयारी करण्यात येत होती. मंगळवारी पहाटेपासून मंदिरात रांगा लागल्या होत्या. पहाटे नित्यपूजा, अभिषेक त्यानंतर आरती तसेच सायंकाळीही आरती, अभिषेक असे अनेक कार्यक्रम दिवसभर होणार आहेत.अंगारकीनिमित्त सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील भाविक मंदिरात दाखल झाले होते. मंदिराची आरास कॅमेराबद्ध करण्यासाठीही तरुणांची झुंबड उडाली होती. गेल्या दोन वर्षांपासून मंदिरात मोठा कार्यक्रम झाला नाही. निर्बंधांमुळे प्रदीर्घ काळ मंदिर बंद राहिले. गणेश जयंती, अंगारकी, गणेशोत्सव असा कोणताही कार्यक्रम मंदिरात थाटात पार पडला नव्हता. निर्बंध उठल्यानंतर आलेली ही पहिलीच अंगारकी असल्याने पंचायत गणपती मंदिर ट्रस्ट व भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.मंदिर परिसराला जत्रेचे स्वरुपमंदिर परिसरात खेळणी, विविध वस्तुंचे स्टॉल्स् व पुजा साहित्य विक्रीसाठी विक्रेत्यांनी गर्दी केली होती. त्यामुळे मंदिर परिसराला जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते.यंदा दोन अंगारकीयंदा कॅलेंडर वर्षात दोन अंगारकी संकष्टी आहेत. एप्रिलमधील अंगारकी संकष्टी पार पडल्यानंतर आता १३ सप्टेंबरला पुढील अंगारकी आहे.
Angarki Sankashti: पहिल्याच अंगारकीला सांगलीतील गणपती मंदिर भाविकांनी फुलले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 11:54 AM