सांगली : भाजपच्या वाटेवर असलेल्या राष्ट्रवादीतील नाराज नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न उद्या, सोमवारी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी केला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराज पाटील यांच्या सांगलीतील निवासस्थानी बंद खोलीत या नेत्यांशी तासभर चर्चा सुरू होती. पक्षाकडून या नेत्यांना योग्य न्याय मिळेल, असे आश्वासन जयंतरावांनी त्यांना दिले. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केला म्हणून जतचे नेते विलासराव जगताप यांची राष्ट्रवादीने हकालपट्टी केली होती. त्यानंतर माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनीही पक्षाच्या कार्यक्रम व बैठकांकडे पाठ फिरवून भाजपचा प्रचार केला होता. घोरपडे व जगताप यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा आता रंगली आहे. त्यामुळे जयंत पाटील यांनी आज त्यांना चर्चेसाठी निमंत्रित केले. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यात त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदेही उपस्थित होते. सुमारे तासभर त्यांच्यात चर्चा सुरू होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जगताप व घोरपडे यांना राष्ट्रवादीतच राहण्याचा सल्ला जयंतरावांनी दिला. पक्षाकडून योग्य न्याय देण्यासाठी प्रयत्न केले जातील. पक्षाला सक्षम नेत्यांची गरज आहे. त्यामुळे जुन्या गोष्टी विसरून दोघांनीही राष्ट्रवादीतच रहावे, असे त्यांनी सूचविले.जगताप व घोरपडे यांनी राष्ट्रवादीतील नेत्यांकडून मिळत असलेली वागणूक, आघाडी धर्मामुळे होत असलेल्या अडचणी, स्थानिक पातळीवर होत असलेल्या राजकीय कुरघोड्या याची माहिती दिली. पक्षाकडून होत असलेल्या दुजाभावाबाबत त्यांनी जयंतरावांना सांगितले. शिंदे व जयंतरावांनी त्यांची समजूत घातली. बैठकीत कोणताही निर्णय झाला नसल्याचे समजते. तरीही या बैठकीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कार्यालयात झालेल्या बैठकीत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी नाराजांना फटकारले होते. नाराज लोकांनी तातडीने पक्ष सोडावा, असा सल्ला त्यांनी दिला होता. त्याच बैठकीत जयंतरावांनी संयमी भूमिका स्वीकारून नाराजांची समजूत घालण्यात येईल, असे सांगितले होते. त्याप्रमाणे त्यांनी आज नाराजांशी चर्चा केली. घोरपडेंचा शड्डू आणि जयंतरावांशी चर्चाएकीकडे आर. आर. पाटील यांच्याविरोधात विधानसभेसाठी घोरपडेंनी शड्डू ठोकला असताना दुसरीकडे जयंतरावांनी त्यांच्याशी चर्चा केल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत घोरपडे तासगाव-कवठेमहांकाळमधून आर. आर. पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपचा प्रयत्न फसला तरी स्वतंत्रपणे मैदानात उतरण्याची त्यांची तयारी आहे. त्यातच त्यांची जयंतरावांशी चर्चा झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
जयंतरावांकडून नाराजांची समजूत
By admin | Published: July 15, 2014 12:55 AM