लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : येथील वानलेसवाडीतील राहुल लोंढे या तरुणाच्या खुनाचा अवघ्या २४ तासांत छडा लावण्यात विश्रामबाग पोलिसांना यश आले. याप्रकरणी मोजेस रामचंद्र भंडारे (वय १९) व प्रशांत सदाशिव बेळे (२१, वानलेसवाडी) या त्याच्या मित्रांना अटक केली आहे. राहुल हा मोजेसच्या आई-वडिलांच्या वैवाहिक जीवनाविषयी नेहमी चेष्टा करत असे. त्यातूनच मोजेसने प्रशांतची मदत घेऊन राहुलचा काटा काढल्याचे निष्पन्न झाले आहे.राहुल हा संशयित मोजेस आणि प्रशांतचा मित्र होता. राहुल व त्याच्या या दोघा मित्रांची घरे वॉन्लेस चेस्ट रुग्णालयाच्या वसाहतीमध्ये आहेत. राहुल दररोज रुग्णालयाच्या बंद असलेल्या ओपीडीत झोपण्यास जात असे. बुधवारी मध्यरात्री तो गाढ झोपेत असताना त्याचा निर्घृण खून झाला होता. दुसºया दिवशी सकाळी त्याची आई त्याला उठविण्यास गेल्यानंतर, हा प्रकार उघडकीस आला होता.मोजेसची आई गर्भवती होती. आठ महिन्यांपूर्वी तिने मुलीला जन्म दिला आहे. मोजेस १९ वर्षांचा असताना, त्याच्या आईला आता मुलगी झाली, यावरून राहुल मोजेसला चिडवत असे. ‘तू १९ वर्षांचा आहेस, तुला आता बहीण कशी झाली?’ असे म्हणून राहुल मोजेसच्या आई, वडिलांविषयी चेष्टा करीत असे. अगदी मित्रांमध्ये बसल्यानंतरही तो याच विषयावरून मोजेसची खिल्ली उडवत असे. चेष्टा न करण्याबाबत मोजेसने त्याला अनेकदा ताकीद दिली होती, पण तरीही तो ऐकत नव्हता.मंगळवारी रात्री राहुल, मोजेस व प्रशांत त्यांच्या मित्राच्या वाढदिवसासाठी गेले होते. तेथेही राहुलने मोजेसची सर्वांसमोर चेष्टा केली. यातून तेथे त्यांच्यात जोरदार वाद झाला. अन्य मित्रांनी त्यांच्यातील वाद मिटविला. त्यानंतर रात्री उशिरा तिघे परी परतले. राहुल नेहमीप्रमाणे वॉन्लेस रुग्णालयाच्या खोलीत झोपायला गेला, पण मोजेसला झोप लागली नाही. तो घरातून बाहेर आला. प्रशांतला त्याने सोबत घेतले. ‘राहुल नेहमी माझ्या आई, वडिलांविषयी चेष्टा करतो. आज तर त्याने मित्रांसमोर त्यांची चेष्टा केली. आता त्याला सोडणार नाही’, असे म्हणून मोजेसने घरातून धारदार शस्त्र आणले व रुग्णालयात जाऊन त्याने झोपलेल्या राहुलच्या डोक्यात वार केले. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने राहुल जागीच मरण पावला. त्यानंतर मोजेस व प्रशांत घरी निघून गेले.‘तो मी नव्हेच’वॉन्लेस रुग्णालयात राहुलचा खून झाल्याने मारेकरी याच भागातील असावेत, असा अंदाज बांधून पोलिसांनी तपासाला गती दिली.अत्यंत बारकाईने तपास केल्यानंतर मित्राचा वाढदिवस साजरा करताना राहुल व मोजेसचे भांडण झाल्याचे समजले.यावरून मोजेसला ताब्यात घेतले. त्याची चौकशी सुरू केली; पण चौकशीला त्याने प्रतिसाद दिला नाही.‘तो मी नव्हेच’, अशी भूमिका त्याने घेतली. मात्र, पोलिसी खाक्या दाखविताच तो पोपटासारखा बोलू लागला. आई-वडिलांविषयी सारखी चेष्टा करीत असल्याने राहुलचा खून केला असल्याची कबुली दिली.या खुनात प्रशांत बेळे याचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. दोघांना रात्री उशिरा अटक करण्यात आली. आज, शुक्रवारी त्यांना न्यायालयात उभे केले जाणार आहे.
चेष्टेतून चिडल्याने मित्रांनीच केली ‘गेम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:49 AM