मिरज : ऊसाला तोड आली नाही म्हणून संतापलेल्या शेतकऱ्याने चक्क ढवळी ग्रामपंचायत आणि विकास सोसायटीलाच टाळे ठोकले. ढवळी (ता. मिरज) येथे सोमवारी (दि. ३१) सकाळी हा प्रकार घडला. ग्रामस्थांच्या मध्यस्थीनंतर दुपारी त्याने स्वत:च कुलुपे काढली.सचिन बाळासाहेब गौराजे असे शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या शेतात सुमारे दीड एकर ऊस लावला आहे. ऊसाची पूर्ण वाढ झाली, तरी तोड येण्याची चिन्हे नव्हती. पाण्याअभावी ऊस वाळण्याचे व उतारा कमी होण्याचे संकट होते. ऊस नेण्यासाठी त्यांनी कारखान्याच्या अधिकाऱ्यांना वारंवार विनंत्या केल्या. गावातील नेतेमंडळींनाही साकडे घातले, पण ऊस हलण्याची चिन्हे नव्हती. अखेर गौराजे मायलेकाने कंटाळून सोमवारी सकाळी ग्रामपंचायत व सोसायटीलाच कुलुपे ठोकली.गौराजे म्हणाले, सोसायटी व ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवेळी नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्याचे आश्वासन सरपंच, सोसायटीच्या अध्यक्षांनी दिले होते. विशेषतः सोसायटीच्या चुरशीच्या निवडणुकीत अध्यक्षांनी वैयक्तिक मला ऊसतोड आणण्याची हमी दिली होती. पण दिलेले आश्वासन त्यांच्या हातून पूर्ण होऊ शकले नाही असा आरोप त्यांनी यावेळी केला.
ऊसाला तोड येईना म्हणून सोसायटी, ग्रामपंचायतीलाच ठोकले टाळे; मिरज तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 1:18 PM