लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : योग्य दर मिळत नाही, सौद्यात बेदाण्याची उधळण करून नुकसान केले जाते, व्यापारी आणि दलाल संगनमताने दर पाडतात, आदी आरोप करून जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी बुधवारी येथील मार्केट यार्डातील बेदाण्याचे सौदे बंद पाडले. योग्य दर मिळत नाही, तोपर्यंत सौदे बंद ठेवण्याची मागणीही केली.
सांगली मार्केट यार्डात बुधवारी बेदाणा सौदे सुरू होते. जतमधील शेतकऱ्याच्या मालाला किलोला ११० रुपयांचा दर मिळाला. दर्जेदार बेदाणा असतानाही कमी दर मिळत असून, किलोला किमान २०० रुपये दर मिळाला पाहिजे, अशी मागणी शेतकऱ्याने केली. त्यावर एवढा दर मिळत नाही, असे सांगून व्यापाऱ्यांनी सौद्यातून तो माल बाहेर काढला. त्यावर उमदी, बिळूर, जाडरबोबलाद, संख येथील शेतकऱ्यांनी आक्रमक होत सौदेच बंद पाडले. व्यापारी आणि दलाल संगनमताने दर पाडतात, सौद्यात तीन ते पाच किलो बेदाण्याची उधळण करून नुकसान केले जाते, असा आरोपही यावेळी करण्यात आला.
जिल्हा परिषदेचे माजी सभापती तम्मणगोंडा रवी-पाटील, संजय तेली, नारायण मोहिते, संगू माळी, दशरथ चव्हाण, शैलेंद्र जगताप आदींनी आक्रमक पवित्रा घेत योग्य दर मिळेपर्यंत सौदे बंद ठेवण्याची भूमिका घेतली. शेतकऱ्यांनी सौदे बंद पाडल्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्राजक्ता कोरे, नंदकुमार कोरे यांनी तेथे भेट देऊन चर्चा केली. दलाल, व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करू नये, अशी सूचना प्राजक्ता कोरे यांनी केली. त्यानंतर बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, संचालक बाळासाहेब बंडगर, सचिव महेश चव्हाण यांनीही आंदोलकांशी चर्चा केली. व्यापारी आणि शेतकऱ्यांची बैठक घेऊन मागण्यांबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
चौकट
बेदाण्याची उधळण केल्यास कारवाई : दिनकर पाटील
बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील म्हणाले की, बेदाण्याचा हमीभाव कायद्यात समावेश नाही. आधीच उधळणीत नुकसान होते, त्यात दोन टक्के कर शेतकऱ्यांकडूनच वसूल होत आहे. याबाबत व्यापाऱ्यांना कठोर सूचना दिल्या आहेत. यापुढे बेदाण्याची उधळण केल्यास कडक कारवाई करू.