इस्लामपूर : पेठ (ता. वाळवा) येथील उमाजीनगर परिसरात १४ ते १५ जणांच्या जमावाने घरात घुसून सशस्त्र हल्ला चढवला. या हल्ल्यात एकाच कुटुंबातील १२ जण जखमी झाले. ग्रामपंचायत निवडणुकीतील पराभवाचा राग मनात धरून हा हल्ला करण्यात आला. मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसात तक्रार देण्यास निघाल्यावर या जमावाने पुन्हा हल्ला केला.याबाबत उज्ज्वला हणमंत जाधव (रा. उमाजीनगर, पेठ) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोहन काशीनाथ मदने, जयराम मदने, ओंकार नंदकुमार मदने, कुणाल मदने, विशाल शिरतोडे, गिरीश मदने, सम्राट दिलीप जाधव, बंटी मदने, स्वप्निल साळुंखे, अमोल मदने, सूरज संजय जाधव, अक्षय रमेश मदने (सर्व रा. उमाजीनगर, पेठ) व ३ ते ४ अनोळखींविरुद्ध मारामारीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.या हल्ल्यात उज्ज्वला जाधव, हणमंत जाधव, करण जाधव, सुनील जाधव, दिलीप जाधव, सुलभा जाधव, निशाराणी जाधव, संभाजी नामदेव जाधव, रुक्मिणी संभाजी जाधव, शुभम जाधव, निखिल जाधव, साहिल जाधव हे जखमी झाले आहेत.मंगळवारी सकाळी ९ च्या सुमारास मोहन मदने याने बेकायदा जमाव जमवून जाधव यांच्या घरात घुसून हा हल्ला केला. या कुटुंबाला बाहेर फरपटत आणून काठ्यांनी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या घटनेची तक्रार देण्यासाठी पोलिस चौकीकडे जात असतानाच हल्लेखोरांनी पुन्हा लाकडी दांडके, लोखंडी पाइप व दगड, विटांनी मारहाण केली. तसेच कुऱ्हाड आणि कोयत्यासारखी घातक शस्त्रे बाळगून दहशत माजवली.
Sangli: निवडणुकीतील पराभवाचा राग; पेठ येथे जमावाचा घरात घुसून हल्ला, १२ जण जखमी
By अविनाश कोळी | Published: October 19, 2023 2:00 PM