बेडग : रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार करत शेतकऱ्यांनी नवा रस्ताच चक्क नांगरुन काढला. आरग (ता. मिरज) येथे बुधवारी सकाळी हा प्रकार घडला. रस्ता नव्याने चांगल्या दर्जाचा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.
आरगमध्ये मोहनराव शिंदे साखर कारखान्यापासून दूरध्वनी कार्यालयामार्गे गावापर्यंतचा रस्ता डांबरी करण्याचे काम सुरु आहे. जुन्याच डांबरी रस्त्यावर खडी व डांबर टाकण्याचे काम बुधवारी सुरु होते. त्यावर पुरेसे रोलिंग केले जात नसल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. शिवाय जुना रस्ता खोदण्याऐवजी त्यावरच खडी पसरली जात होती. त्यामुळे डांबरीकरण मजबूत होत नव्हते. हे लक्षात येताच ग्रामस्थ व शेतकरी एकत्र आले. त्यांनी ठेकेदाराच्या कर्मचाऱ्याला जाब विचारला. पण तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. ग्रामस्थांनी खोऱ्याने खडी उकरुन काढली असता खालीही डांबर दिसले नाही. फक्त धूळ निघत होती. त्यामुळे ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. त्यांनी रस्त्यावरुन जाणारा एक ट्रॅक्टर अडवला. त्याच्या मदतीने सुमारे एक किलोमीटर रस्ता नांगरुन काढला.
ग्रामस्थ बी. आर. पाटील, रमेश देसाई, विठ्ठल पाटील, अनिकेत पाटील, बसगौंड लांडगे आदींनी सांगितले की, शासनाकडे वर्षानुवर्षे पाठपुरावा केल्यानंतर रस्त्यासाठी निधी मिळाला आहे. त्यामुळे तो चांगला व्हावा असा आग्रह आहे. ठेकेदाराने मार्चच्या गडबडीत काम सुरु केले आहे. डांबराचा पुरेसा वापर केला नाही. रोलिंगही केले नाही. त्यामुळे हा रस्ता टिकणार नाही. ठेकेदाराने पुन्हा नव्याने रस्ता करेपर्यंत आम्ही पाठपुरावा करणार आहोत. बांधकामच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही कामाच्या दर्जाकडे लक्ष द्यावे, अन्यथा आम्हाला त्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या मारावा लागेल.