सांगली : अनिकेत कोथळे याला पोलीस कोठडीत पोलिसांनी बेदम मारहाण केल्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचे विच्छेदन तपासणीत स्पष्ट झाले आहे. तब्बल दोन महिने तपासणीची ही प्रक्रिया सुरू होती. छातीवर व पोटात मारहाण झाल्याने फुफ्फुस व किडनीत अंतर्गत रक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.सांगली शहर पोलिसांनी ६ नोव्हेंबर २०१७ ला लूटमारीच्या गुन्ह्यात अनिकेत कोथळे व अमोल भंडारेला अटक केली होती. गुन्हा कबूल करण्यासाठी अनिकेतला नग्न करून उलटा टांगून बेदम मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे नेऊन जाळला होता. याप्रकरणी बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, राहुल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला, झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले व कामटेचा नातेवाईक बाबासाहेब कांबळे या सातजणांना अटक केली होती. मृतदेह अर्धवट जळाला होता, त्यामुळे विच्छेदन तपासणीला वेळ लागला. त्याच्या मृत्यूचे निदान लावणे, ही आव्हानात्मक बाब होती. मिरज वैद्यकीय महाविद्यालयात तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाºयांकडून तब्बल दोन महिने तपासणी सुरु होती. तपासणीची ही प्रक्रिया दोन दिवसांपूर्वी पूर्ण झाली. त्यामुळे गुरुवारी अनिकेतचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला होता.बेदम मारहाण झाल्यामुळे अनिकेतचा मृत्यू झाल्याचे विच्छेदन तपासणीत स्पष्ट झाले आहे. अनिकेतला नग्न करून उलटा टांगून जाड व बोथट हत्याराने छातीवर व पोटावर बेदम मारहाण केली. त्यामुळे फुफ्फुस व किडनीत अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे निदान झाले आहे. आतापर्यंत सीआयडीकडे डीएनए, विच्छेदन तपासणी व शरीररचना विभागाचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. शहर पोलिस ठाण्यातील घटनेवेळीचे सीसीटीव्ही फुटेज संशयितांनी नष्ट केले होते. सीसीटीव्हीचा डीव्हीआर तपासणीला पाठविला आहे. पण त्याचा अहवाल अजून आलेला नाही.५४ जणांचे जबाबअनिकेत कोथळे खून प्रकरणात पोलीस उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्या पथकाने आतापर्यंत ५४ जणांचे जबाब घेतले आहेत. अजूनही तपास सुरू असल्याने जबाब घेण्याचे काम सुरू आहे.येत्या फेब्रुवारी २०१८ च्या पहिल्या आठवड्यात संशयितांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. याप्रकरणी संशयित आरोपींविरुद्ध गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) भक्कम पुरावे गोळा केले आहेत.
अनिकेतचा मृत्यू बेदम मारहाणीमुळेच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 1:15 AM